पुणेः भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गिरीश बापट हे भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच दीनाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
गिरीश बापट यांचा पुण्यातील राजकारणात गेली अनेक वर्षे दबदबा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज सायंकाळी सात वाजता गिरीश बापट यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप अडचणीत आला होता. त्यावेळी गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलिंडर होते. या मेळाव्यात बोलताना त्यांना प्रचंड धाप लागत होती. आजारपणातही भाजपने त्यांना प्रचारात उतरवल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टिकास्त्रही सोडले होते.
मनमिळावू स्वभावाचा नेता गेला-खा. सुप्रिया सुळेः गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाचवेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळावू स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असे खा. सुळे यांनी ट्विट करून म्हटले आहे.