रायपूरः रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी खूपच भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी केलेल्या भाषणात पक्ष आता नवीन नेतृत्वाला सांभाळायचा आहे, आता आपण राजकीयदृष्ट्या संन्यास घेत आहोत, असा स्पष्ट संदेशच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. आपण राजकीय संन्यास घेत असल्याचे संकेत देत सोनिया गांधी म्हणाल्या की, त्यांची बारी ‘भारत जोडो यात्रेसोबत संपुष्टात येत आहे.’ भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी महत्वपूर्ण वळण असल्याचेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या तीन दिवसीय मंथन संम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी १,५००० प्रतिनिधींना सोनिया गांधी यांनी संबोधित केले. भारतातील लोकांना सदभावना, सहिष्णुता आणि समानता हवी आहे, हे भारत जोडो यात्रेने सिद्ध करून दाखवले आहे. ही यात्रा एका महत्वपूर्ण वळणावर झाली आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
काँग्रेसचे ८५ वे पूर्णकालीन अधिवेशन शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यात अन्य विरोधी पक्षांबरोबर निवडणूक युती करण्याबाबतच्या निर्णयाचाही समावेश आहे.
काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही. ज्या माध्यमातून भारताचे लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सर्वांसाठी न्यायाची लढाई लढतात, त्याचे आम्ही वाहक आहोत. ही देश आणि पक्षासाठी आव्हानाची वेळ आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
मोदी सरकारने संवैधानिक संस्थांवर कब्जा केला आहे. द्वेषाची आग पेटवली जात आहे. देशाचे प्रधानमंत्री आपल्या मित्राच्याच मदतीत मश्गुल आहेत. भाजपकडून अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी, महिलांना लक्ष्य करून द्वेषाची आग भडकवली जात आहे. पक्षाने या वर्गाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या भारत जोडो यात्रेच्या समाप्तीनंतरच काँग्रेसचे हे अधिवेशन होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात तीन महिने चाललेली भारत जोडो यात्रा राजकीय विश्लेषकांच्या मते यशस्वी ठरली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना पुन्हा काँग्रेसशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप- आरएसएसच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याच्या विरोधात संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे.