पैठणः संदीपान भुमरेंना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पैठण तालुक्यात शाळा, वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण त्यांनी मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर दारूची ९ दुकाने उघडली. गाडी थांबवून गिऱ्हाईकाने थेट काटून जावे म्हणून दुकानांसमोर गतीरोधक बसवले, दुसरे काय केले? अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्री संदीपान भुमरेंवर हल्लाबोल चढवला.
अजित पवार हे आज पैठण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. एका सभेला संबोधित करताना त्यांनी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. पैठण तालुक्याला जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचे आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालये हे सर्व काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले. भुमरेंनी काय दिले? याचा लोकांनीच विचार करायला हवा, असे अजित पवार म्हणाले.
पाच वर्षे निघून जातात. एकदा शेतकऱ्यांचे पिक उद्धवस्त झाले, तर तीन वर्षे शेतकऱ्याला उमजत नाही. एक आमदार चुकीचा निवडला तर पुढे तुमचे वाटोळे होते, असा खोचक टोलाही अजित पवार यांनी भुमरेंना लगावला.
संदीपान भुमरेंना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पैठण तालुक्यात शाळा, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी दारूची ९ दुकाने उघडली. दुकानासमोर गतिरोधक बसवले. का तर… गाडी थांबावी आणि गिऱ्हाइकाने थांबत टाकून जावे. लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळेजवळ गतिरोधक बसवतो. मात्र या पद्धतीने स्वतःची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवता. कुठे फेडाल हे पाप? तळतळाट लागेल, अशा शब्दांत अजित पवारांनी संदीपान भुमरेंचा समाचार घेतला.