औरंगाबादः औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहेत, तसतसे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. या मतदारसंघात विजयी होण्यासाठी २५ हजार ३८६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना आतापर्यंत २० हजार ७८ मते मिळाली आहेत.
सध्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत ५३ हजार २५६ मतांची मोजणी पूर्ण झाली असून त्यापैकी २ हजार ४८५ मते अवैध ठरली आहेत. एकूण वैध ठरलेल्या ५० हजार ७७१ मतांपैकी विक्रम काळे यांना २० हजार ७८ मते मिळाली आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील हे १३ हजार ४८९ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कालिदास माने यांना १ हजार ४३ मते मिळाली आहेत.
प्रदीप सोळुंकेंना मिळाली केवळ ४३५ मतेः राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रदीप सोळुंके यांना मतदारांनी चांगलाच हात दाखवला असून त्यांना फक्त ४३५ मते मिळाली आहेत. प्रदीप सोळुंके यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विनंती केली होती. त्यांची विनंती धुडकावून प्रदीप सोळुंके या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत बाजी मीच मारणार असा त्यांचा दावाही होता. परंतु आज प्रत्यक्ष मतमोजणीचे निकाल हाती येऊ लागले, तशी प्रदीप सोळुंके यांची मतदारांच्या लेखी काय ‘किंमत’ आहे, हेही स्पष्ट होऊ लागले आहेत.