मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘ भारत जोडो’ यात्रा नांदेड जिल्ह्यात असताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या यात्रेचे दिमाखदार नियोजन केले. पण या यात्रेत त्यांची धाकटी मुलगी श्रीजया सक्रीय दिसली. यात्रेदरम्यान श्रीजया ही राहुल गांधींशी चर्चा करताना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि अशोक चव्हाण हे श्रीजयाला राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही तेव्हापासूनच सुरू झाली. यावर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझा तसा कोणताही विचार नाही. परंतु त्यांची इच्छा असेल तर त्या राजकारणात येतील, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा पाच दिवस नांदेड जिल्ह्यात होती. अशोक चव्हाणांनी या यात्रेच्या केलेल्या नियोजनाची चर्चा तर झाली परंतु सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते ते राहुल गांधींच्या बरोबरीने चालणारी आणि त्यांच्याशी चर्चा करताना दिसलेली अशोक चव्हाणांची धाकटी मुलगी श्रीजया हिने!
भारत जोडो यात्रेत श्रीजया कमालीची सक्रीय दिसली. त्यामुळे अशोक चव्हाण श्रीजयाला राजकारणात लाँच करण्याची तयारी करत आहेत का? अशी चर्चाही तेव्हा झाली. श्रीजयाचा राहुल गांधींसोबत चर्चा करतानाचा व्हिडीओही तेव्हा व्हायरल झाला होता आणि या चर्चेने वेग घेतला होता.
या एकूणच चर्चेवर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना श्रीजयाच्या राजकारण प्रवेशाबद्दल अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मी माझ्या मुलीला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण आजची पिढी सल्ला घेण्याच्या मानसिकतेत नाही. ही पिढी कोणाचेही ऐकत नाही. भारत जोडो यात्रा पाच दिवस नांदेड जिल्ह्यात होती. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या यात्रेत माझे कुटुंबीय सहभागी झाले होते. अनेक लोकांसोबत माझ्या मुलीदेखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. याचा अर्थ माझ्या मुलींना राजकारणात आणण्याची माझी भूमिका होती असा होत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
त्यांना राजकारणात आणण्याची मी भूमिका घेतलेली नाही. त्यांची इच्छा असेल तर त्या राजकारणात येतील. इच्छा नसेल तर राजकारणात येणार नाहीत. माझी यामध्ये कोणतीही भूमिका नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, अशी स्पष्टोक्तीही अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाणांचे ट्विट ठरले होते चर्चेचा विषयः राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत श्रीजया सहभागी झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेचा एक व्हिडीओ शेअर करत केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी अशोक चव्हाणांनी केलेले हे ट्विट म्हणजे त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा असल्याची चर्चाच तेव्हा झाली होती.
पाखरांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत अशोक चव्हाणांनी हे ट्विट केले होते. ‘पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार’ अशा भावूक शब्दांत अशोक चव्हाणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. लेकीसाठी अशोक चव्हाणांनी केलेले हे भावूक ट्विट त्यांच्या राजकीय वारसदाराचे लाँचिंग असल्याचे समजण्यात येत होते.
श्रीजयाबद्दल थोडेसे… श्रीजया ही अशोक चव्हाणांची धाकटी मुलगी. जन्मापासूनच घरात राजकारणाचा वारसा लाभलेल्या श्रीजयाने कायद्याची पदवी संपादन केली आहे. श्रीजया सध्या वडिल अशोक चव्हाणांच्या ‘बँक ऑफिस’ची जबाबदारी सांभाळते. अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर श्रीजया लक्ष ठेवते. आजपर्यंत निवडणुकीचा प्रचार वगळता श्रीजयाने स्वतःला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवले आहे. मात्र आता अशोक चव्हाणांनी तिला राजकारण प्रवेशाबाबत फ्रीहँड दिल्यामुळे श्रीजया राजकारणात सक्रीय होणार की अलिप्त राहणेच पसंत करणार? हे नजीकच्या काळात पहायला मिळेल.