‘भारत जोडो’नंतर काँग्रेस ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान घेऊन पुन्हा मैदानात!


नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेमुळे सबंध देश ढवळून काढल्यानंतर ही यात्रा शेवटच्या टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. जम्मू काश्मीरमध्येच भारत जोडो यात्रेचा समारोप होणार असून या यात्रेच्या समारोपापूर्वीच काँग्रेसने आणखी एका अभियानाची घोषणा केली आहे. ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान घेऊन काँग्रेस पुन्हा मैदानात उतरणार आहे.

याबाबत आज शनिवारी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी जयराम रमेश आणि काँग्रेस सरचिटणीस खा. के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या पत्रकार परिषदेत हाथ से हाथ जोडो अभियानाचे बोधचिन्हही जारी करण्यात आले आहे.

 हाथ से हाथ जोडो अभियानाचा प्रारंभ २६ जानेवारी रोजी होईल. हे अभियान दोन महिने म्हणजेच २६ मार्चपर्यंत चालेल. या काळात काँग्रेस कार्यकर्ते साडेसहा लाख गावातील अडीच लाख ग्रामपंचायतींच्या हद्दीतील १० लाख बुथमधील प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतील, असे वेणुगोपाल म्हणाले.

या पत्रकार परिषदेत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात एक चार्जशीट म्हणजेच आरोपपत्रही जारी केले. या आरोपपत्रात मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत माहिती देण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास प्रदेश काँग्रेस कमिट्या राज्य सरकारांच्या विरोधातही असे आरोपपत्र जारी करतील, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

 १३० दिवस चाललेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला बरेच इनपूट मिळाले. पायी चालत असताना राहुल गांधी यांनी लाखो लोकांशी चर्चा केली. मोदी सरकारच्या कुशासनामुळे लोकांना ज्या यातना सोसाव्या लागत आहेत, त्या यातना आम्ही समजू शकतो. भारत जोडो यात्रेदरम्यान जनतेकडून मिळालेले इनपूट घरोघरी पोहोचवण्यासाठीच हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करण्यात येत आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.

भारत जोडो यात्रेच्या विपरित हाथ से हाथ जोडो अभियान पूर्णतः राजकीय स्वरुपाचे असेल. या अभियानातून काँग्रेसच्या राजकीय मोहिमेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल. या अभियानाच्या काळात मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला जाणार आहे.

काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन हाथ से हाथ जोडो या नव्या अभियानाचा लोगो जारी केला.

‘ भ्रष्टाचार जुमला पार्टी’ केवळ काही निवडक लोकांच्या हितासाठीच काम करत आहे. हे लोक केवळ आपल्या फायद्यासाठी काम करत आहेत आणि उर्वरित सर्व लोकांना धोका देऊन फसवणूक करत आहेत, असा आरोप काँग्रेसने मोदी सरकारविरोधात जारी केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एका उद्योगपतीच्या खासगी विमानातून नवी दिल्लीला आले होते. त्यांची मोदींशी जवळीक जगजाहीर आहे. ज्यांची संपत्ती २०१४ पासून आजपर्यंत ५० पटींनी वाढली आहे. देशातील ३० टक्के संसाधने एकट्या त्या उद्योगपतीला देण्यात आले आहेत. मोदींच्या त्या मित्राचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, मात्र गरजू शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही, असा आरोपही काँग्रेसने आरोपपत्रात केला आहे.

भाजपकडून काँग्रेसवर एका कुटुंबाचा पक्ष म्हणून सातत्याने टीका करण्यात आली आहे. परंतु आता काँग्रेसने घराणेशाही हल्ला चढवला आहे. भाजप ही ‘भाई-भतीजा पार्टी’ असून या पक्षाचे ६५ लाभार्थी आहेत. त्यात २० मंत्री, १४ खासदार आणि ३१ आमदारांचा समावेश आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अमित शाह यांचे चिरंजीव भारतीय क्रिकेट चालवतात तर दुसरीकडे अग्नीवीरांना सेक्युरिटी गार्ड बनण्यासाठी सांगितले जात आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

 ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या तरंगत्या मृतदेहांनी गंगा भरून वहात होती, तेव्हा नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारसभांत मग्न होते. भाजपने ३०० हून अधिक आमदार/खासदार खरेदी केले आणि लोकांचा जनादेश धुडकावून सात राज्यांतील सरकारे पाडली. मोदींच्या मित्रांनी सर्व टीव्ही आणि प्रिंट मीडिया खरेदी करून टाकला. आयटी, ईडी आणि सीबीआयमार्फत स्वतंत्र आवाज दडपून टाकले जात आहेत, असा आरोपही या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!