नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभेच्या कसबापेठ आणि पिपंरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. या दोन्ही मतदारसंघात २७ फेब्रुवारीला मतदान आणि २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. याचबरोबर ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.
कसबापेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. ३१ जानेवारी रोजी या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी आहे.
८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छानणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २७ फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघात मतदान होईल आणि २ मार्च रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्यामुळे आता भाजप येथून कोणाला संधी देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तीन राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगुलः केंद्रीय निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला केला आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांतील मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.