औरंगाबादः भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी (१५ जानेवारी) गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली असतानाच शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. मुंडेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचा हा पंधरा दिवसातील दुसरा दौरा आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही ऑफर दिली आहे. ठाकरे गटाच्या या ऑफरनंतर पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांनी दांडी मारली. या आधी ३१ डिसेंबर रोजी बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीलाही फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्याही वेळी पंकजा मुंडे तिकडे फिरकल्याही नाहीत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या औरंगाबाद दौऱ्यापासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आले होते. मराठवाड्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडेंना भाजप पक्षश्रेष्ठींच्या कार्यक्रमातून डावलण्यात आल्याचा आरोप करत मुंडे समर्थकांनी टिकास्त्र सोडले होते. तेव्हाही पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा झाली होती.
पंकजा मुंडे यांना पक्षाकडून सातत्याने डावलण्यात येत असल्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रविवारी त्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे पुन्हा ही चर्चा केंद्रस्थानी आली आहे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफरच देऊ केली आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे खैरे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष करण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. सध्याच्या घडीला पंकजा मुंडे यांना दूर करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे किंवा इतर कोणत्या नेत्याने पंकजा मुंडेंना दूर केले असेल, असे खैरे म्हणाले.
पंकजा मुंडेंना भाजपकडून डावलण्यात येत असल्याचा आरोपही खैरे यांनी केला. सध्या भाजपात मुंडे परिवाराला डावलण्याचे काम सुरू आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण त्यांना पक्षात घेण्याचा पूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडे यांना बहीण मानले आहे. त्यामुळे त्यांना ठाकरे गटात घेण्यास काहीच हरकत नाही, असे खैरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.
मुंडेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांच्या फेऱ्या, मुंडेंना बेदखल करण्याची खेळी?: एकीकडे पंकजा मुंडेंना भाजपकडून डावलण्यात येत असल्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच दुसरीकडे मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे दौरे वाढले आहेत. गेल्या पंधरा दिवसांतच फडणवीस हे बीड जिल्ह्यात दोनवेळा येऊन गेले आहेत.
मुंडेंचा हा बालेकिल्ला त्यांच्या ताब्यातून काढून घेण्यासाठीच फडणवीसांनी बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. राज्य पातळीवर भाजपच्या राजकारणात एकीकडे डावलेले जात असतानाच दुसरीकडे पंकजा मुंडेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातूनही बेदखल करण्याची तर ही खेळी नाही ना? अशी शंकाही मुंडे समर्थक घेऊ लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफरचा स्वीकार करून भाजपमधून बाहेर पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.