‘एसीपी’ने दारूच्या नशेत अश्लील चाळे करत केला मित्राच्या पत्नीचा विनयभंग; उत्तररात्री औरंगाबादेत हायप्रोफाईल ‘ड्रामा’!


औरंगाबादः औरंगाबाद शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे साहयक पोलिस आयुक्त (एसीपी) विशाल ढुमे यांनी दारूच्या नशेत ओळखीच्या मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे करत गाडीत विनयभंग केला. नंतर घरी गेल्यावर त्या महिलेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्याचा आग्रह धरत महिलेचा पती, दीर आणि सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा खळबळजनक हायप्रोफाईल ड्रामा शनिवारी उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास नारळीबाग परिसरात घडला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात विशाल ढुमेंच्या विरोधात विनयभंग आणि घरात घुसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय पीडिता अभ्यासिका चालवते. पीडितेच्या पतीशी गुन्हे शाखेचा सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमेंशी ओळख आणि मैत्री आहे. पीडित महिला १४ जानेवारीच्या रात्री पावणे आकरा वाजेच्या सुमारास सिडको भागातील पाम रेस्टॉरंटमध्ये पती, मुलीसह जेवण करण्यासाठी गेलो होते. त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे हे मित्रासह जेवणासाठी आलेले होते.

 पीडिता कुटुंबीयासह फॅमिली सेक्शनमध्ये तर विशाल ढुमे हे मित्रासह पर्सनल सेक्शनमध्ये बसलेले होते. जेवण झाल्यानंतर पीडितेच्या पतीने विशाल ढुमे हे ओळखीचे असल्यामुळे पर्सनल सेक्शनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते दोघेही अन्य दोघांसह पीडित महिला बसलेल्या फॅमिली सेक्शनमध्ये आले. त्यावेळी विशाल ढुमेंनी पीडित महिलेच्या पतीला पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत लिफ्ट देण्याची विनंती केली. ही विनंती त्यांनी मान्य केली.

पाम रेस्टॉरंटसमोरून उत्तररात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सर्व जण पोलिस आयुक्तालयाकडे निघाले. पीडित महिलेचा पती ड्रायव्हर सीटवर बसला तर पीडिता त्याच्या बाजूच्या सीटवर मुलीला घेऊन बसली. विशाल ढुमे मागच्या सीटवर बसले. चालत्या कारमध्येच विशाल ढुमेंनी मागूनच पीडित महिलेशी अश्लील चाळे सुरू केले. तिच्या टी शर्टमध्ये हात टाकून अंगाला स्पर्श केला. पीडित महिलेने विशाल ढुमेंना बाजूला लोटल्यानंतरही त्यांनी तिला चिमटा काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 पोलिस आयुक्तालय आल्यानंतर विशाल ढुमे हे तेथे न उतरता त्यांच्या कारमधूनच पीडित महिलेच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर पीडित महिलेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरू देण्यासाठी विशाल ढुमेंनी आग्रह धरला. पीडितेच्या पतीने विशाल ढुमेंना समजावून सांगत घरी जाण्याची विनंती केली. परंतु विशाल ढुमे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

 हे सगळे पाहून पीडित महिलेची सासू खाली आली. त्यांनीही ढुमे यांना रात्र झाली आहे, तुम्ही घरी जा, अशी विनवणी केली. तेव्हा विशाल ढुमेंनी त्यांच्यासह पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ केली.

दारूच्या नशेत तर्रर असलेले विशाल ढुमे जबरदस्तीने पीडित महिलेच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेले. तेव्हा पीडितेच्या सासूने स्वतःची रूम उघडून देत त्याठिकाणचे वॉशरूम वापरण्यास सांगितले. परंतु विशाल ढुमेंचा आग्रह पीडित महिलेच्याच बेडरूमधील वॉशरूम वापरण्याचाच होता.

विशाल ढुमे काही केल्या ऐकत नसल्याचे पाहून पीडित महिलेच्या पतीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. हा गोंधळ ऐकून शेजारचे नागरिकही गोळा झाले. तेव्हा विशाल ढुमेंनी पीडित महिलेचा पती व दीराला मारहाण केली. शेवटी पोलिस ढुमेंना ११२ क्रमांच्या गाडीत टाकून घेऊन गेले.

 सुमारे तीन वाजेच्या सुमारास हे प्रकरण सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले. पीडितेच्या कुटुंबासह स्थानिक नागरिकांनी विशाल ढुमेंच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना पोलिस ठाण्यातून माहिती देण्यात आली. गिरी यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. माहिती समजताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पीडितेसह तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांना धीर देत गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. गुन्हा दाखल केल्यानंतर उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी तपासाला सुरूवात केली. पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पीडितेसह अन्य महिलांचे जबाब नोंदवले.

विशाल ढुमेंच्या विरोधात भादंविच्या कलम ३५४, ३५४(ड), ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ४५२, ३५४ ही कलमे अजामीनपात्र आहेत. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाला तर सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी विशाल ढुमेंची पोलिस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली. गृह मंत्रालयाला या घटनेचा अहवाल पाठवला. ढुमेंच्या निलंबनाबाबतचा निर्णय मंत्रालय पातळीवरच घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

विशाल ढुमे हे आधी गडचिरोली येथे कार्यरत होते. तेथून अहमदनगर येथे पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. अहमदनगर येथे विशाल ढुमेंनी आठ महिने काम केले. कामाच्या ठिकाणी गैरवर्तन, कर्तव्यात कसुरी आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांची औरंगाबादेत बदली करण्यात आली होती. औरंगाबादेत आल्यानंतरही त्यांनी आपले कारनामे सुरूच ठेवले. त्यातूनच शनिवारी उत्तररात्री पाम रेस्टॉरंट ते नारळीबाळ असा हायप्रोफाईल ड्रामा घडला. औरंगाबादेत सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!