राज्यपाल कोश्यारींना काळे झेंडे दाखवणाऱ्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संतप्त संभाजीराजे म्हणाले: हा कुठला न्याय?


पुणेः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईवर संभाजीराजे छत्रपती संतप्त झाले असून संवैधानिक मार्गाने निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक आणि छत्रपतींबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा, हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांच्यासह शिवसेना आणि अन्य बिगर भाजप पक्षानी कोश्यारींचा निषेध करत त्यांची राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. कोश्यारींच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोश्यारींना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून संभाजीराजे छत्रपती संतप्त झाले आहेत.

राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक!  आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? स्वराज्यचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंह कोश्यारीला काळे झेंडे दाखवले’,  असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. आमच्या दैवतांचा, महापुरूषांचा अवमान करून कोश्यारी हे उजळ माथ्याने राज्यात फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संवैधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात, असेही संभाजीराजे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *