पुणेः रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमात आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गोखले यांच्यावर गेल्या वीस दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांनी शेवटचा श्वास घेतला.
रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तिन्ही माध्यमात गोखले यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१६ मध्ये त्यांनी घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयापासून संन्यास घेतला होता. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजनी शोक व्यक्त केला आहे.