जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांची नावे अंतिम निवड यादीत, अर्थशास्त्र विषयाच्या पीएच.डी. प्रवेशास हाय कोर्टाची अंतरिम स्थगिती


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. च्या प्रवेशासाठी प्रसिद्ध केलेल्या निवड यादीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याचे नाव अंतिम निवड यादीत प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने ही अंतरिम स्थगिती दिली.

याचिकाकर्ता शिवराज हुंबे या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. ला प्रवेश मिळवण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातून पेट परीक्षा दिली होती. पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संशोधन मान्यता समितीसमोर (आरआरसी) सादरीकरण झाल्यानंतर विद्यापीठाने अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली होती.

आरआरसीसमोरील सादरीकरणानंतर शिवराज हुंबे या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एकत्रित ५९ गुण मिळाले होते. असे असतानाही शिवराज हुंबे याच्यापेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी पूजा बारहात (५७.२० गुण) आणि सचिन निमत (५५ गुण) या विद्यार्थ्यांची नावे एसईबीसी प्रवर्गाच्या अंतिम निवड यादीत प्रसिद्ध करण्यात आली होती.

आपल्यापेक्षा कमी गुण असलेल्या विदयार्थ्यांच्या नावाचा अंतिम निवड यादीत समावेश करण्यात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत शिवराज हुंबे या विदयार्थ्याने ऍड. महेश भोसले यांच्यामार्फत अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. च्या अंतिम निवड यादीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान ऍड. महेश भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेली चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. च्या अंतिम निवड यादीस अंतरिम स्थगिती दिली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!