बौद्ध धम्माला बुद्धाची गरज आहे का?, एलन मस्क यांनी केली गौतम बुद्धांशी स्वतःची तुलना


वॉशिंग्टनः ‘बौद्ध धम्माला बुद्धाची गरज आहे का?’ असा प्रतिप्रश्न करत टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी गुरूवारी स्वतःची तुलना गौतम बुद्धांशी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात एलन मस्क यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी (डोज) म्हणजेच सरकारी कार्यकुशलता विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तुमच्यानंतर ‘डोज’चे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न मस्क यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमध्ये एलन मस्क यांनी माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारल्या. ज्याप्रमाणे गौतम बुद्धाशिवाय बौद्ध धम्म टिकून राहिला आहे, त्याचप्रमाणे ‘डोज’चे कामही माझ्याशिवाय सुरूच राहील. तुमच्यानंतर ‘डोज’चे पुढचे नेतृत्व कोणाकडे असेल? असे पत्रकारांनी विचारले असता ‘बौद्ध धम्माला बुद्धाची गरज आहे का?’  असा प्रतिप्रश्नच एलन मस्क यांनी पत्रकारांना केला.

 माझ्या गैरहजेरीतही ‘डोज’चे सरकारी खर्च कमी करण्याचे काम सुरूच राहील. ‘डोज’ही बौद्ध धम्माप्रमाणेच एक जीवनशैली आहे. बौद्ध धम्माप्रमाणेच ‘डोज’लाही पुढे जाण्यासाठी विशिष्ट नेतृत्वाची आवश्यकता नाही. बौद्ध धम्माला बुद्धाची गरज आहे का? बुद्धांच्या निधनानंतर बौद्ध धम्म अधिक समृद्ध झाला नाही का?, असे एलन मस्क म्हणाले.

 फेडरल कर्मचारी कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही महत्वाच्या कर्मचाऱ्यांना चुकून काढून टाकण्यात आले, अशी कबुलीही एलन मस्क यांनी दिली.  विशाल फेडरल नोकरशाहीमध्ये असे काही लोक आहेत की, सगळे पूर्वीसारखेच असले पाहिजे असे त्यांना वाटते. ते बदलायचे म्हणजे सुपरटँकरच्या ताफ्याची दिशा बदलण्यासारखे आहे, असे मस्क म्हणाले.

 ‘डोज’मध्ये सुमारे १०० कर्मचारी काम करतात. किती कर्मचारी त्यांचे काम सुरू ठेवतील हे स्पष्ट नाही. काही रहातील, काही जातील. माझ्याशिवायही ‘डोज’चे प्रयत्न सुरू राहतील. किमान ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अवधीसंपेर्यंत तरी, असे मस्क म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून तुमच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी कायम राखाल काय? असे विचारले असता ‘मला तसे वाटते’ असे मस्क म्हणाले.

‘डोज’ने सुरूवातीला जुलै २०२६ पर्यंत सरकारी खर्चात १ ट्रिलियन डॉलरच्या कपातीचे लक्ष्य पूर्ण करून आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत जवळपास १६० दशलक्ष डॉलर कपातीचे लक्ष्य साध्य करण्यात आले आहे, असे मस्क म्हणाले.

जुलै २०२६ पर्यंत ‘डोज’ला आपले लक्ष्य साध्य करता येईल का? असे विचारले असता जर आम्ही त्या तारखेवर कायम रहावे असे राष्ट्राध्यक्षांना वाटत असेल तर आम्ही त्या तारखेवर कायम राहू, असे मस्क म्हणाले. मस्क यांना विशेष सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे, त्याची मुदत ३० मे रोजी संपणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!