
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनीच ५ टक्क्यांप्रमाणे पैसे गोळा करायला सांगितले होते, अशी धक्कादायक कबुली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या दोन्ही शिपायांनी जबाबात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. मात्र डॉ. कैलास पाथ्रीकरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सफाई कामगारपदावरून सेवानिवृत्त झालेल्या महिलेची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची ३ लाख ६३ हजार ६१९ रुपये रक्कम विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाकडून मिळवून देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल (२४ एप्रिल) एसीबीच्या पथकाने रुपचंद बाबुलाल मुंगसे आणि दीपक नंदकिशोर रॉय या दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. मुंगसे हा कुलगुरु कार्यालयात तर रॉय हा परकीय भाषा विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहे.
एसबीच्या पथकाने या दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. विद्यापीठातील एकूण १३० ते १४० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी आमच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाथ्रीकर हे आम्हा कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तेथे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ५ टक्के रक्कम द्यावी लागेल, असे ठरले होते. कैलास पाथ्रीकर यांनी मला प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ५ टक्के रक्कम जमा करण्यास सांगितले होते, असे रुपचंद बाबुलाल मुंगसे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मुंगसे यांनी त्याचा जबाब त्याचा पुतण्या किरण मुंगसे मार्फत लिहून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहसंचालक आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्षांच्या सांगण्यावरून आम्ही सर्व कर्मचारी पैसे जमा करत होतो. दुपारी एक मुलगा आला व त्याने मला रुपचंद मुंगसेबद्दल माहिती विचारली असता मी माझ्या फोनवरून मुंगसे यांच्याशी संपर्क केला असता मला रुपचंद मुंगसे यांनी त्या मुलाकडून १८३०० रुपये घेण्यास सांगितले व ते पाकिट संध्याकाळी घेऊन जातो असे सांगितले. ते पाकिट घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने मला अटक केली, असे दीपक रॉयने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. रॉय याने त्याचा जबाब त्याचा जावई संजय पैठणेमार्फत लिहून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाथ्रीकर म्हणतातः तर नोकरीचाच राजीनामा देईन!
या दोन शिपायांनी दिलेल्या जबाबाबद्दल न्यूजटाऊनने विद्यापीठ कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. या प्रकरणात माझा थोडाही सहभाग आढळला तर विद्यापीठातील नोकरीचाच राजीनामा देईन, असे पाथ्रीकर म्हणाले. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाचा एक पैसाही इकडे तिकडे केला नाही. त्यामुळे पूर्वग्रह दूषित हेतूने बदला घेण्यासाठी माझे नाव घेतले गेले असावे, अशी शंकाही त्यांनी घेतली.
गेल्या २५ वर्षांपासून मी कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करतो. विद्यापीठाची पतसंस्था किंवा कर्मचारी संघटनेचे काम मी पदरमोड करून करत आलो आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घेऊन सहसंचालक कार्यालयात गेलो होतो. परंतु टक्केवारीचा विषय झाला नाही. उलट काही लोक पैसे मागत असल्याचे कळल्यानंतर मीच चर्तुथ श्रेणी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैश्यासाठी तुम्ही कोणाला पैसे देताच कशाला? असे म्हणत दोन दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांवर रागावलो होतो. त्यामुळे पैसे गोळा करा, असे मी सांगण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणात माझा थोडाही सहभाग आढळला तर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाचाच नव्हे तर मी विद्यापीठाच्याच नोकरीचा राजीनामा देईन, असे पाथ्रीकर म्हणाले. याबाबत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
आतापर्यंत ३५ जणांकडून गोळा केले पैसे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसीबीने अटक केलेल्या विद्यापीठातील दोन शिपायांकडे एक यादी सापडली असून या यादीत कर्मचाऱ्याचे नाव, त्याला मिळणारी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि त्या रकमेपोटी ५ टक्क्यांप्रमाणे गोळा केलेली रक्कम याचा तपशील असल्याचे सांगण्यात येते. गोळा केलेली रक्कम ३ लाख ८७ हजार ७०० रुपयांपर्यंत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

