
व्हॅटिकन सिटीः आपले संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेवासाठी वेचणारे पोप फ्रान्सिस यांचे आज (२१ एप्रिल) सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. व्हॅटिकनडून एक व्हिडीओ जारी करून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचे वृत्त आणि शोक संदेश दिला आहे.
पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथॉलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. १३ मार्च २०१३ रोजी ते या चर्चचे २६६ वे पोप बनले होते. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिलेच पोप ठरले होते. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटले जायचे. पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनातील ब्यूनस आयर्स येथे झाला होता. त्यांचे खरे नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लियो असे होते.
पोप हे रोमन कॅथॉलिक चर्चचे सर्वात मोठे धर्मगुरू असतात. रोमचे बिशप आणि व्हॅटिकनचे राज्याध्यक्ष यांना पोप म्हटले जाते. पोप जे निर्णय घेतात त्याचा परिणाम जगभरातील कोट्यवधी कॅथॉलिक लोकांवर होत असतो. पोप फ्रान्सिस यांचे जीवन देव आणि चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांनी नेहमी लोकांना प्रेम आणि धैर्याने जगण्याचा संदेश दिला. त्यांनी लोकांना चांगले काम करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे ते नेहमी लोकांच्या मनात राहतील, असे व्हॅटिकनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी चर्चमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम केले, त्यामुळे ते लोकांत प्रसिद्ध होते. आतापर्यंतचे सर्वच पोप व्हॅटिकन सिटीतील भले मोठे पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत आले होते. परंतु पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारले आणि स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील एक छोटेसे घर निवडले. त्यांच्या या निर्णयाची जगभर चर्चा झाली.
इस्टर संडेला पोप फ्रान्सिस हे सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांसमोर आ ले होते. त्यांनी लोकांना इस्टरच्या शुभेच्छा दिल्या पण त्यांनी इस्टरच्या प्रार्थनेत सहभाग घेतला नाही. काही दिवसांपूर्वीच पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती.
फेब्रुवारी महिन्यात रोम येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आधी ढासळली होती. परंतु नंतर ती हळूहळू सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. अखेर आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांनी शेवटचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कॅथॉलिक समुदायावर शोककळा पसरली आहे.

