
लखनऊ/नांदेडः महाकुंभमेळ्यात स्नान करून आयोध्येला जात असताना नांदेडच्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या खासगी बसला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन जण नांदेडच्या तर एक जण हिंगोली जिल्ह्यातील आहे.
आज रविवारी पहाटे महाकुंभमेळ्त स्नान करून नांदेड व आसपासच्या भागातील भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी पूर्वांचल एक्सप्रेसवेने अयोध्येला टेम्पोट्रॅव्हलरने जात असताना उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील लोणी कटरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नादुरूस्त झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या खासगी बसवर ही टेम्पोट्रॅव्हलर धडकली.
ही खासगी बस छत्तीसगडहून अयोध्येला जात असताना नादुरूस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती आणि तिच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नांदेडच्या भाविकांना घेऊन भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोट्रॅव्हलरने या खासगी बसवर पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोट्रॅव्हलरच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले.
या भीषण अपघातात टेम्पोट्रॅव्हलरमधील चार जणांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पोट्रॅव्हलरमधील भाविक केबिनमध्ये अडकून पडले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.
घटनास्थळी पोलिसही दाखल झाले. गॅस कटरच्या साह्याने टेम्पोट्रॅव्हलरमध्ये अडकून पडलेले तीन मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. एका गंभीर भाविकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, अशी माहिती बाराबांकीचे पोलिस अधीक्षक दिनेशकुमार सिंग यांनी दिली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नांदेडच्या छत्रपती चौकातील रहिवासी सुनिल दिगंबर वरपडे (वय ५० वर्षे), अनुसया दिगंबर वरपडे (वय ८० वर्षे), दिपक गणेश गोदले (वय ४० वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील रहिवासी जयश्री कुंडलिकराव चव्हाण (वय ५० वर्षे) यांचा समावेश आहे.
नांदेड व आसपासच्या परिसरातील भाविक टेम्पोट्रॅव्हलर भाड्याने करून महाकुंभमेळ्यात स्नानासाठी गेले होते. या टेम्पोट्रॅव्हलरमध्ये एकूण २३ भाविक असल्याची माहिती मिळते. मृतांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नांदेडला आणण्यात येणार आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकांवर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे अशी
या भीषण अपघातात जखमी झालेले सर्व भाविक नांदेडच्या छत्रपती चौकातील रहिवासी आहेत. त्यांची नावे अशीः अनिता सुनिल वरपडे (वय ४० वर्षे), वीर सुनिल वरपडे (वय ९ वर्षे), चैतन्य राहुल स्वामी (वय १६ वर्षे), शिवशक्ती गणेश गोदले (वय ५५ वर्षे), भक्ती दीपक गोदले (वय ३० वर्षे), आर्या दीपक गोदले (वय ५ वर्षे), लोकेश गोदले (वय ३५ वर्षे), रंजना महेश मठपती (वय ५५ वर्षे), गणेश गोदले (वय ५५ वर्षे), सुनिता माधवराव कदम (वय ६० वर्षे), छाया शंकर कदम (वय ६० वर्षे), ज्योती प्रदीप गैबडी (वय ५० वर्षे), श्रीदेवी बरगले (वय ६० वर्षे).