
नवी दिल्लीः जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या JEE Main 2025 अंतिम उत्तर कुंजीमध्ये (फायनल आन्सर की) त्रुटी आढळल्यामुळे तब्बल १२ प्रश्न काढून टाकण्यात आल्यामुळे ही परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून एनटीएच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
अंतिम आन्सर कीमधील त्रुटींमुळे १२ प्रश्न काढून टाकण्यात आल्यानंतरही जेईई परीक्षेतील त्रुटीच्या दराने (एरर रेट) आपली निर्धारित मर्यादा ओलांडली असून हा दर ०.६ टक्क्यांवरून वाढून १.६ टक्क्यांवर गेला आहे. काढून टाकण्यात आलेले प्रश्न, अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न आणि भाषांतरातील घोडचुकांचा हवाला देत विद्यार्थी आणि शिक्षक आता एनटीएच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करू लागले आहेत.
एनटीएकडून जेईई, नीट, यूजीसी-नेट अशा महत्वाच्या परीक्षा घेतल्या जातात. जेईई परीक्षेच्या आन्सर कीमध्ये त्रुटी आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु यावेळी अंतिम आन्सर कीमधील त्रुटींमुळे काढून टाकण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एनटीएची विश्वासार्हताच पणाला लागली आहे.
उपलब्ध डेटाची पडताळणी केली असता असे आढळून येते की, जेईई मेन २०२५ च्या सेशन-१ च्या अंतिम आन्सर कीमुळे एकूण १२ प्रश्न काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या परीक्षेतील प्रश्नांची संख्या ९० वरून कमी होऊन ७५ झाली आहे. त्या तुलनेत जेईई मेन २०२४ च्या सेशन-१ मधून सहा प्रश्न आणि सेशन-२ मधून चार प्रश्न हटवण्यात आले होते.
जेईई मेन २०२३ आणि २०२४ च्या सेशन-१ मधील सहा प्रश्न हटवण्यात आले. २०२३ च्या परीक्षेच्या सेशन -१ मधून पाच प्रश्न तर २०२२ च्या सेशन-१ व सेशन-२ मधून क्रमशः चार व सहा प्रश्न हटवण्यात आले होते. विशेष म्हणजे जेईई मेन २०२१ च्या सेशन-१ आणि सेशन-२ मधून एकही प्रश्न हटवण्यात आला नव्हता.
गुजराती विद्यार्थ्यांना झुकते माप
भाषांतरातील विसंगींमुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेईई मेन २०२५ च्या सेशन-१ च्या फायनल आन्सर कीमध्ये भाषांतराच्या किमान दोन त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. चुकीचे उत्तर नंतर योग्य दाखवण्यात आले. त्यामुळे आणखीच विसंगती निर्माण झाली.
हिंदी आणि गुजरातीमध्ये उत्तरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरांचे दोन पर्याय देण्यात आले होते तर अन्य विद्यार्थ्यांना केवळ एकच पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे जेईई मेन परीक्षेच्या निष्पक्षतेविषयीच शंका घेण्यात येऊ लागली आहे.
अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न
जेईई मेन २०२५ मध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारून एनटीएने आणखीच विश्वासार्हता गमावली आहे. मागील दोन वर्षांपासून अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेला न्यूटनचा कूलिंग लॉ जेईई मेनच्या सेशन-१ मध्ये समाविष्ट करण्यात आला. या परीक्षेत न्यूटनच्या कूलिंग लॉशी संबंधित २२ प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक वर्षांपूर्वी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या कार्नोट सायकलवर अचानक प्रश्न विचारण्यात आले.
अभ्यासक्रम आणि परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न यात कुठलाच ताळमेळ नसल्यामुळे विद्यार्थी बुचकळ्यात पडले. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याने लिहिलेल्या उत्तराची पुन्हा पडताळणी करायची असेल तर त्याला प्रत्येक प्रश्नासाठी २०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत.
