
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या कसदार लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार रा.रं. बोराडे यांचे आज मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा जन्न २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतंचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. माढा, बार्शी, सोलापूर आणि तत्कालीन औरंगाबादेत त्यांचे शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण झाले. नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य नागरी भागात राहिले तरी मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाने व येथील ऋतूचक्राने घडवलेला अस्सल ग्रामीण पींड त्यांनी सोडला नाही.
१९६३ मध्ये ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९९७ मध्ये ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील देवगिरी महाविद्यालय आणि परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय प्राचार्य अशी बोराडे यांची ओळख होती. सन २००० मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
१९९७० नंतरच्या काळात मराठी साहित्यात कसदार ग्रामीण साहित्याचा झंझावाती प्रवाह सुरू झाला. प्राचार्य रा.रं. बोराडे हे या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामीण कथाकारांपैकी एक होते. ५५ वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली ‘पाचोळा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. होती. प्राचार्य रा.रं. बोराडे हे इयत्ता दहावीत असताना त्यांची वसुली ही पहिली कथा १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. ते एम.ए. मराठी करतअसताना त्यांचा पेरणी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता.
कष्टकऱ्यांच्या दुःखाला भाषिक अविष्कारातून सार्थ वाचा फोडण्याचे काम प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी केले. त्यांच्या कथासंग्रहातून मराठवाड्यातील कष्टाची माणसे उभी राहिली. खेड्यातील सामाजिक बदलही त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून चपखलपणे टिपले. त्याचबरोबर कौटुंबिक ताणेबाणेही प्रकर्षाने मांडले. त्यांच्या अस्सल मराठवाडी बाज असलेल्या लेखनशैलीमुळे त्यांची ओळख ग्रामीण कथाकार अशी झाली. ती त्यांनी शेवटपर्यंत जपली.
प्राचार्य बोराडे यांचे कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा राखण, बोळवण आदी ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित आहेत. रहाट पाळणा, आमदार सौभाग्यवती, सावट, वळणाचं पाणी, मरणदारी, पाचोळा अशा कादंबऱ्यांनी प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. शिका तुम्ही हो शिका ही त्यांची बालकादंबरीही प्रसिद्ध आहे.
प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी विनोदी कथालेखनही केले आहे. फजितगाडा, खोळंबा, ताळमेळ, हेलकावे इत्यादी त्यांचे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी कश्यात काय आणि फाटक्यात पाय, चूकभूल घ्यावी द्यावी, हसले गं बाई फसले, बंधमुक्ता, चोरीचा मामला, मी आमदार सौभाग्यवती, मलाच तुमची म्हणा अशा नाटकांतून वैविध्यपूर्ण विषय रंगभूमीवर मांडले आहेत.
प्राचार्य रा.रं. बोराडे यांना मागच्याच आठवड्यात राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. प्राचार्य बोराडे यांनी १९८९ मध्ये हिंगोली येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला. त्यांना जयवंत दळवी नाट्यलेखन पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. प्राचार्य बोराडे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले.