मुंबई: केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी सत्व याचा लाभ देण्याबाबतचा पर्याय शाळांना देण्यात आला, असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. केंद्र शासनाने सद्य:स्थितीत प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ५.४५ रुपये आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ८.१७ प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्च मर्यादा निश्चित केली आहे.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीच्या शिफारशीनुसार ११ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नवीन पाककृती निश्चित करण्यात आली होती.
या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरिता लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था/ बचत गट, योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली होती.
ही निवेदने तसेच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता पाककृती सुधार समितीने शिफारस केलेल्या पाककृतींचा समावेश करुन तसेच, सुधारित पाककृतीनुसार लाभ देण्याबाबतचा २८ जानेवारी २०२५ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
या शासन निर्णयातील पाककृतींमधील अनु.क्र. ११ (अंडा पुलाव) व अनु.क्र. १२ (गोड खिचडी/ नाचणी सत्य) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून यापूर्वी विद्यार्थ्यांना अंडी/ केळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. केंद्र शासनामार्फत तृणधान्यातील पौष्टिकतेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत तृणधान्याचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पेसा क्षेत्रातील व आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहाराचा लाभ देण्यासाठी मिलेट बार उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही केंद्र शासनाकडून प्राप्त होते. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे आदी स्वरुपात पूरक आहार देण्यात येत असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.