नियमांची पायमल्ली करून प्रयोगशाळा तंत्रज्ञाची परीक्षा विभागात बदली नेमकी कोणत्या ‘प्रयोगा’साठी?, विद्यापीठाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  तांत्रिक बाबींचे तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची अतांत्रिक बाबींसाठी असलेल्या हुद्द्यावर बदली करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.बी. चव्हाण यांची परीक्षा विभागात बदली नेमकी कोणत्या ‘प्रयोगा’साठी केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी कुलगुरूंच्या दालनात वैधानिक अधिकाऱ्यांसमक्ष परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना अरेरावी करत अर्वाच्च भाषा वापरून अपमानित केल्यामुळे डॉ. गवळी यांनी संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. हे सगळे रामायण परीक्षा विभागात कार्यरत असलेले प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुधाकर बाळू उर्फ एस.बी. चव्हाण यांच्यावरून घडले. त्यामुळे संतप्त झालेले परीक्षा विभागातील कर्मचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने कुलगुरू आणि थेट कुलपतींकडे लेखी तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली.

हेही वाचाः कुलपतींनी तंबी देऊनही विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांची पुन्हा कुलपतींकडे तक्रार

बी. एस, चव्हाण यांची नियुक्ती प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर झाली आहे. विद्यापीठातील विज्ञान शाखेच्या विविध विभागातील प्रयोगशाळांमध्ये प्रात्यक्षिके करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक सहाय्य पुरवण्याची मुख्य जबाबदारी त्यांची आहे. नियमानुसार अशा तांत्रिक पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची अतांत्रिकपदावर बदली करताच येत नाही. तरीही एस. बी. चव्हाण यांची परीक्षा विभागात नियमबाह्य बदली का आणि कोणी केली?, हा प्रश्नच आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोणतीही प्रयोगशाळा नाही. वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विज्ञान शाखेच्या विभागातच प्रयोगशाळा आहेत आणि एस. बी. चव्हाण यांचे काम या प्रयोगशाळांमध्येच असताना परीक्षा विभागात त्यांची बदली नेमकी कोणत्या ‘प्रयोगा’साठी करण्यात आली? कोणाचे हितसंबंध जोपाण्यासाठी तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्याची अतांत्रिकपदावर बदली करण्यात आली?  या प्रश्नाची उत्तरे विद्यापीठ प्रशासनातील कोणीही द्यायला तयार नाही.

एस.बी. चव्हाण हे परीक्षा विभागात बदलीने रूजू झाल्यानंतर कोण्याही एका कक्षात नीटपणे काम करत नाही. कामापेक्षा त्यांचे उपद्व्यापच जास्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा त्रास होतो. परंतु चव्हाण हे अधिसभा सदस्य झाल्यापासून परीक्षा विभागात त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन आणि स्वतंत्र कार्यभाराची मागणी केली. ती पूर्ण न केल्यामुळे परीक्षा विभागावर त्यांना दबाव वाढवला आणि अडवणूक केल्यामुळे त्यांची बदली बीसीएस कक्षातून पदवी कक्षात करण्यात आली. तेथेही त्यांनी कामापेक्षा इतर अनावश्यक उद्योग सुरू केल्यामुळे पदवी कक्षातून त्यांची बदली पीएच.डी. कक्षात करण्यात आली, असे परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एखादा कर्मचारी विद्यापीठाच्या शिस्तविषयक नियमांचे एवढे खुलेआम उल्लंघन करत असेल आणि ज्या विभागात आपले पदच नाही, त्या विभागात तो कर्मचारी स्वतंत्र दालनाची आणि स्वतंत्र कार्यभाराची मागणी करून परीक्षा विभागाची अडवणूक करत असेल तर विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याच्यावर अद्याप कारवाई का केली नाही?  असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.  आता तरी विद्यापीठ प्रशासन अतांत्रिकपदावर ठाण मांडून बसलेल्या तांत्रिकपदावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवणार का? याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!