
नांदेडः लातूरपाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून लोहा तालुक्यातील किवळा परिसरातील १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे ५१ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. आता नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
लोहा तालुक्यातील किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांची २० पिल्ले सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळी होती. जिल्हा परिषदेच्या पशुसंवधर्न विभागाने मृत कोंबड्याचे नमुने पुण्यातील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेकडे पाठवले होते. या मृत कोंबड्याचे नमुने पॉझिटिव्ह आले असून बर्ड फ्लूमुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
किवळा परिसरातील मृत कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून किवळा परिसरातील ५६५ कोंबड्या ताब्यात घेतल्या आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून या कोंबड्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार किवळा येथील १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन घोषित केल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार अलर्ट झोन क्षेत्रात जिवंत अथवा मृत कोंबड्या, अंडी, कोंबडीचे खत, पक्षी खाद्याशी संबंधित साहित्य आणि उपकरणाच्या वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे.
५ किलोमीटर परिसरात चिकनची दुकाने बंद
बर्ड फ्लूची लागण झालेल्या पोल्ट्री फार्मपासून प्रभावित क्षेत्राच्या ५ किलोमीटर त्रिजेतील परिसरात कोंबड्याच्या खरेदी-विक्रीची दुकाने, कोंबड्याच्या मांसाची विक्री करणारी चिकन सेंटर, वाहतूक, बाजार, यात्रा आणि प्रदर्शन आदी बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्म परिसरात नागरिकांना जाण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
