परभणीः सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते आणि संविधानाचे रक्षण करत होते. त्यामुळेच पोलिसांनी त्यांची हत्या केली, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी मला पोस्टमार्टेम रिपोर्ट, छायाचित्रे आणि व्हिडीओ दाखवले आहेत. हा शंभर टक्के कोठडीतील मृत्यूच आहे. पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले आहेत. हा युवक (सोमनाथ सूर्यवंशी) दलित होता आणि संविधानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता म्हणूनच पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
संविधान उद्धवस्त करणे ही आरएसएसची विचारसरणी आहे. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचे रक्षण करत होता, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी तत्काळ कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
या घटनेत कोणतेही राजकारण होत नाही. विचारसरणी जबाबदार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले आहे, म्हणून मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींना ज्यांनी कुणी मारले आहे ते जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शक्य तितक्या लवकर कारवाई झाली पाहिजे. हत्या झाली आहे म्हणून न्याय मिळाला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात निवेदन करताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला नाही, असे सांगितले होते. त्यावरूनही राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले, असे म्हणत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.