नवी दिल्लीः नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महत्वाच्या स्थळांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांची नावे देण्यात यावी. तसे न झाल्यास संघर्ष अटळ आहे, अशा धमक्या देणारे फोन या साहित्य संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहद या संस्थेला येत आहेत. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असताना आणि या संमेलनाच्या उद्घाटनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येण्याची शक्यता असताना अशा धमक्यांचे सत्र सुरू झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १९ डिसेंबर रोजी या साहित्य संमेलनाचे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या माहितीपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, सी.डी. देशमुख आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची छायाचित्रे आहेत. परंतु यात सावरकर का नाही? अशी विचारणा करणारे फोन आणि मेसेज सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना येत आहेत.
वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन केले जात असून या संमेलनाशी तसा थेट संबंध नसतानाही माझी पत्नी आणि भावालाही याबाबत विचारणा केली जात आहे, असे संजय नहार यांनी म्हटले आहे. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नवी दिल्लीतील साहित्य संमेलनातील महत्वाच्या ठिकाणांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, असे मोबाइल फोन आम्हाला मोठ्या प्रमाणावर येत आहेत. दोन जणांनी नथुराम गोडसे याचाही यथोचित सन्मान करण्याचा आग्रह धरला आहे. मी त्यांना त्यांचे म्हणणे लेखी देण्याची विनंती केली. तसाही हा विषय साहित्य महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. आमची जबाबदारी केवळ व्यवस्था पाहणे इतकीच आहे, असे पुण्याच्या सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.