छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत’ संस्थेच्या लक्षित खुल्या प्रवर्गाच्या गटातील उमेदवारांसाठी सोलर पॅनल देखभाल व दुरुस्तीचा निवासी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर व लातूर येथे होणार आहे. इच्छुक व गरजू युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने अनुदान देऊन अनेक ठिकाणी सोलार पॅनेल बसवून वीज पुरवठा, कृषी पंप बसवण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत सोलर पॅनेलची उभारणी, देखभाल व दुरुस्ती इत्यादी कामांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग करण्याची संधी उपलब्ध होईल. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर व लातूर येथे ७ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत तांत्रिक व उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पात्रताः प्रशिक्षण खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’ लक्षित गटातील उमेदवारांसाठी आहे. प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा २१ ते ५० वर्ष आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र/गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेला कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असल्याबाबत तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला, विवाहित असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड इत्यादी झेरॉक्स प्रती प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धतीः इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या वेबसाईटवर आपला अर्ज अपलोड करून अर्जाची हार्डकॉपी व अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती जोडून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग भवन या ठिकाणी प्रत्यक्ष सादर करावा.
२३ रोजी प्रशिक्षण परिचय कार्यक्रमः जिल्हा कार्यालयामध्ये प्रवेश अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १ जानेवारी २०२५ आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी एमसीईडी जिल्हा कार्यालय येथे एकदिवसीय निःशुल्क परिचय कार्यक्रम आयोजीत केला आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित सर्व जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग भवन या ठिकाणी संपर्क साधावा व प्रवेश अर्ज सादर करावा असे आवाहन ‘अमृत’ चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, एमसीईडीचे कार्यकारी संचालक बी. टी. यशवंते आणि उद्योग सहसंचालक सुदाम यांनी केले आहे.