‘इतक्या वेळा आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्माचा स्वर्ग मिळाला असता’: अमित शाहांचे वादग्रस्त वक्तव्य, देशभरात संताप


नवी दिल्लीः काँग्रेस पक्षासाठी आंबेडकराचे नाव घेणे ‘फॅशन’ बनले आहे. जर त्यांनी इतक्या वेळा आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना ७ जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत केले.  असे वक्तव्य करून अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत आक्रमक विरोधकांनी बुधवारी संसदेत हंगामा करत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

संविधानाला ७५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसीय चर्चा झाली. या चर्चेचा समारोप करताना मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत काही विधाने केली. ‘आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… इतक्या वेळा नाव जर देवाचे घेतले असते तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता,’ असे वादग्रस्त वक्तव्य अमित शाह यांनी केले. अमित शाह हे वक्तव्य करत असताना काँग्रेस सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतले.

अमित शाह यांनी संसदेत मंगळवारी हे विधान केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘जे लोक मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात, त्यांना निश्चितच आंबेडकरांविषयी समस्या असेल,’ असे राहुल गांधी म्हणाले.

बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष या मुद्द्यावर आक्रमक झाला. विरोधी पक्षांनी बुधवारी या मुद्यावर चर्चेसाठी नोटीस दिली आणि अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दोन्ही सभागृहात चर्चेची परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली.

 संविधानाच्या ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षासाठी आंबेडकरांचे नाव वारंवार घेणे ही फॅशन बनली आहे, असे वक्तव्य करून डॉ. आंबेडकरांचे महत्व खारीज केले आहे.  असे वक्तव्य करून शाह यांनी आंबेडकरांचे महान योगदान तुच्छ लेखले. संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. आंबेडकरांनी निभावलेली महत्वपूर्ण भूमिका कमकुवत करण्याचा हा एक निंदनीय प्रयत्न आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला असे संविधान दिले की, जे विशेषतः वंचित समुदायासाठी समता, न्याय आणि सन्मानाची हमी देते, असे या मुद्यावर राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस देणारे काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी म्हटले आहे.

बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक झाले. अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन सुरू झाले. खासदारांनी अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत अमित शाह यांनी केलेली टिप्पणी आरएसएस आणि भाजपच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचेच द्योतक असल्याचा आरोप केला. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

नेमके काय म्हणाले अमित शहा? पहा व्हिडीओ

बाबासाहेब ‘मसिहा’चः खरगे

भाजप आणि त्यांचे वैचारिक पालक आरएसएस तिरंग्याच्या विरोधात होते आणि अशोकचक्रालाही त्यांचा विरोध होता, हेच अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून सिद्ध केले आहे, असे टिकास्त्र काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोडले आहे. ‘ते संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करू इच्छित होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तसे होऊ दिले नाही. त्यामुळेच ते बाबासाहेबांचा एवढा द्वेष करतात. माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांसाठी बाबासाहेब देवापेक्षा अजिबात कमी नाहीत, हे मोदी सरकारमधील मंत्र्यांना समजले पाहिजे. बाबासाहेब हे दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि गरिबांसाठी मसिहाच आहेत,’ असे खरगे म्हणाले.

 विधानसभेतही पडसाद

तिकडे संसदेत या मुद्यावरून विरोधकांनी रान पेटवले असताना नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही या मुद्यावरून विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी विधानसभेत अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

बाबासाहेबांचे नाव घेण्याचा इतका द्वेष का आहे? हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे. संविधानाला मानणाऱ्या सर्व समाजाचा, दलित समाजाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, भाग्यविधाता आणि ईश्वरदेखील आहेत. परमेश्वरदेखील आहेत. त्यामुळे त्यांचा असा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, असे नितीन राऊत म्हणाले.

माणूस एकटा लढला, पण जगाला भारी पडला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन आहे का? गांधी, आंबेडकर हे जगाचे विचारस्त्रोत ठरले. जगभरात जिथे-जिथे शोषणाविरोधात माणसे उभे राहतील, त्यांचा आदर्श काय असेल तर तो आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेल. माणूस एकटा लढला, पण जगाला भारी पडला. तुम्ही त्यांना फॅशन आहे असे म्हणता?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने आंबेडकर, आंबेडकर हा जप केलाच पाहिजे. ते त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या नावाची टिंगल करणे चुकीचे असून आंबेडकर ही फॅशन नसून ‘पॅशन’ आहे, असे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!