परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरूण कार्यकर्त्याचा कोठडीतच मृत्यू, शहरात पुन्हा तणाव


परभणीः परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर आंबेडकरी समुदायाने या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही विकृत समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (११ डिसेंबर) रोजी आंबेडकरी समुदायाने परभणी बंदची हाक दिली होती.

या बंददरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या हिंसाचारानंतर परभणी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. या हिंसाचार प्रकरणी २७ जणांना अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी शहरातील नवा मोंढा, नानलपेठ, जिंतूर, गंगाखेड अशा सर्व पोलिस ठाण्यात मिळून एकूण ५०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

परभणी पोलिसांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून अटक केलेल्या २७ जणांना गुरूवारी (१२ डिसेंबर) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावणीत आली होती. शनिवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलिसांनी अटक केलेल्या या २७ जणांमध्ये सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशीची काल शनिवारी सायंकाळी न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती बिघडली. आज त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

सोमनाथ सूर्यवंशी हा परभणी शहरातील शंकरनगर भागात भाड्याची खोली घेऊन रहात होता. तो कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहितीही समोर येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा कट्टर आंबेडकरी कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

परभणीत पुन्हा तणाव

सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यामुळे परभणी शहरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शिवाजी उमाप हे परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथचा मृत्यू नेमका कशामुळे हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. सोमनाथच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सोमनाथच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

संचारबंदी नाही, जमावबंदी

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शिवाजी उमाप हे परभणी शहरात तळ ठोकून बसले आहेत. परभणी शहरात सध्या जमाव बंदी आहे, मात्र कोणतीही संचारबंदी नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता वाटत नाही, असे उमाप यांनी सांगितले. परभणी शहरात एसआरपीएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील भागात एसआरपीएफच्या तुकड्यांचा वापर केला जाणार असल्याचे उमाप यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!