परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, आंबेडकरी अनुयायांच्या बंदला हिंसक वळण; शांतता राखण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन


परभणीः  शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी आज पुकारलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले आहे. बंदच्या काळात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात भारतीय संविधानाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंगळवारी या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. विटंबनेचा हा प्रकार उघडकीस येताच मंगळवारी काही वेळातच परभणी शहर बंद करण्यात आले होते.

या प्रकरणाची धग आजही कायम आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी आज परभणी बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले.

बंद दरम्यान आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ करून या घटनेचा निषेध नोंदवला. आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

कायदा हातात घेऊ नकाः प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या सर्व हल्लेखोर समाजकंटकांनी येत्या २४ तासांत अटक करा अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, शांतता राखा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी अनुयायांना केले आहे.

बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!