मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच घेतलेली घेतलेली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेत अनेक असंबंध आणि तर्कहीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. स्त्रियांच्या शिक्षणाचा संबंध थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेशी जोडून या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा नुकतीच राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. मात्र या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यासाठी देण्यात आलेले पर्याय यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून एमपीएससीच्या बौद्धीक दिवाळखोरीचे धिंडवडे काढले जात आहेत.
या परीक्षेत विचारण्यात आलेल्या ४१ व्या क्रमांकाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग टिकेचा धनी बनला आहे. ४१ व्या प्रश्नात स्त्रियांच्या शिक्षणाचा संबंध थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेशी जोडण्यात आला आहे. स्त्रिया शिकल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते, असे थेट निष्कर्षवजा विधान करून हा प्रश्न विचारण्यात आला आहे. तो प्रश्न असाः
प्रश्न क्र. ४१: स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते कारणः
उत्तराचे पर्याय
(a) शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
(b) शिक्षीत स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षीत व्हावे वाटते.
(c) शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते.
(d) स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.
स्त्रिया शिकल्या म्हणजे त्यांची प्रजननक्षमता कमी होते, असा ठाम निष्कर्ष काढूनच या प्रश्नामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचा संबंध थेट तिच्या प्रजननक्षमतेशी जोडण्यात आला आहे. शिक्षणाचा संबंध लोकसंख्या नियंत्रणाशी जोडणे वेगळे आणि स्त्री शिक्षणाचा संबंध थेट तिच्या प्रजननक्षमतेशी जोडून प्रश्न विचारण्यात आल्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाकडे इतक्या मागास दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा लोकसेवा आयोग कसा पाहू शकतो? असा सवाल आता केला जाऊ लागला आहे.
एमपीएससीच्या याच परीक्षेत दारूशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एमपीएससीवर टिकेची झोड उठली असतानाच आता याच परीक्षेतील स्त्री शिक्षणाशी वादग्रस्त प्रश्न बाहेर आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. दारूशी संबंधित विचारलेला प्रश्न असाः
प्रश्नः तुमच्या मित्रांना दारु पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराय?
उत्तराचे पर्याय
- मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
- दारू पिण्यास नकार देईन.
- फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
- नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात एमपीएससीच्या परीक्षेत असे अजब आणि तर्कहीन प्रश्न विचारण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर नेटिझन्स एमपीएससीवर टिकेची झोड उठवत आहेत. असे अजब आणि अतर्क्य प्रश्न विचारून एमपीएससीला काय साध्य करायचे आहे? असा नेटिझन्सचा सवाल आहे.
एमपीएससीने बिनशर्त माफी मागावी
एमपीएससीने स्त्रियांच्या शिक्षणाचा संबंध थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेशी जोडून प्रश्न विचारल्यामुळे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त् केला आहे. ‘हे पूर्णतः लज्जास्पद आणि अस्वीकार्य आहे. विशेषतः छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि महामानव डॉ. आंबेडकरांच्या आदर्शावर चालणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी हे चालणार नाही. ज्या लोकांनी ही प्रश्नपत्रिका तयार केली आणि एमपीएससीच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही प्रश्नपत्रिका मान्य केली, त्यांनी बिनशर्त माफी मागावी,’ असे खा. प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
दोन्हीही प्रश्न योग्य आहेत एमपीएससी मार्फत अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक तर्कशक्ती लक्षात येण्यासाठी आयोगाने हे प्रश्न विचारले असतील