मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम, मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि मतमोजणी प्रक्रियेवर अनेक उमेदवारांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. महायुतीला मिळालेले प्रचंड बहुमत हा जनमताचा कौल नसून ‘चोरलेला कौल’ आहे, अशी टिकाही विरोधकांकडून केली असतानाच काँग्रेसने निवडणूक आयोगाला या निवडणुकीसंदर्भात १० प्रश्न विचारले असून त्या दहा प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणा-या व्यक्तींकडून उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल आमचे काही प्रश्न आहेत, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे दहा प्रश्न विचारले आहेत. त्यांनी ट्विट करून विचारलेले ते प्रश्न असेः
- मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर दोन तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशीराने का येत होता?
- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२% मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२% मतदान कसे झाले?
- प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण एक मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही?
- रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फूटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत?
- राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते?
- मतदानाच्या दुस-या दिवशी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी ६६.५% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली?
- रात्री उशारापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला?
- २० नोव्हेबंर रोजी सायंकाळी ५८.२२% मतदान आणि २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६५.२% मतदान झाल्याच्या आकडेवारील ७.८३% वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही?
- एकूण मतामध्ये ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?
- निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहचवली नाही?
ताळमेळ कुठेच बसत नाही
वरील सर्व प्रश्न आणि मतदारसंघनिहाय अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. मतदानाची टक्केवारी, मतदान वाढ, मतांची गणना यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण का देण्यात आलेले नाही?, असा सवालही पटोले यांनी केला आहे.
लोकांची मते चोरण्याचे काम करू नका
लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
एका दिवसात ९,९९,३५९ मते कशी वाढली?
मतदानाच्या टक्केवारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरही नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?, असे सवाल नाना पटोले यांनी केले आहेत.
लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खापवून घेणार नाही, असा इशाराही पटोले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.