मुंबईः मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो निर्णय घेईल, तो माझ्यासह शिवसेनेला मान्य असेल असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून निर्माण झालेला पेच सुटला असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा कोणत्या अटींवर सोडला? शिंदे केंद्रात जाणार का? नव्या सरकारमध्ये त्यांची भूमिका काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? असे अनेक प्रश्न आता चर्चिले जात असून या प्रश्नांची काही उत्तरे स्वतःच शिंदेंनी दिली तर काही उत्तरे सूत्रांकडून समोर येत आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, परंतु भाजप त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास तयार नाही. त्यामुळे शिंदे नाराज आहेत, मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, अशा बातम्या आणि चर्चा गेल्या पाच दिवसांपासून येत होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी आज स्वतःच पत्रकार परिषद घेऊन या चर्चा खोट्या ठरवल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सत्ता स्थापनेबद्दल निर्णय घ्यावा. त्याला आमचा पाठिंबा असेल. आमच्यामुळे कोणतीही बाधा येणार नाही. भाजप नेतृत्वाने घेतलेला निर्णय माझ्यासह शिवसेनेला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर करून टाकले.
या घोषणेबरोबरच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळेल, हे निश्चित आहे. हे पद स्वतः एकनाथ शिंदे स्वीकारतात की आपल्या निकटवर्तीयाची वर्णी लावतात, हे लवकरच कळेल.
का सोडला मुख्यमंत्रिपदावरील दावा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीत महत्वाच्या गाठीभेटी झाल्या. काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. त्यानंतरच एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.
शिवसेनेने नव्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची मागणी केली आहे. गृहमंत्रिपदासह अन्य काही महत्वाची खातीही शिवसेनेने मागितली आहेत. त्याबाबत सराकात्मक संकेत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नव्या सरकारमध्ये भूमिका काय?
नव्या मंत्रिमंडळात तुमची भूमिका काय असेल? तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार का? तुम्ही गृहमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे, असे प्रश्न पत्रकारांनी शिंदेंना विचारले. त्यावर उद्या दिल्लीत आमची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत या सगळ्यावर चर्चा होईल. या चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. मी उपमुख्यमंत्री होणार की आणखी काही? ते उद्या ठरेल, असे शिंदे म्हणाले.
राज्यात राहणार की केंद्रात जाणार का?
आता राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. भाजपच्या उमेदवाराला माझे समर्थन असेल. मी महायुतीला पाठिंबा द्यायलाच इथे बसलोय, असे शिंदे म्हणाले. यावर तुम्ही राज्यात राहणार की केंद्रात जाणार? असा प्रश्न शिंदेंना एका पत्रकाराने विचारला. त्यावर अरे तू मला तिकडे का पाठवत आहेस? असा प्रतिप्रश्न शिंदेंनी केला. त्यामुळे शिंदे केंद्रात जाणार नाहीत, राज्यातच राहणार हेही स्पष्ट झाले आहे.