नांदेड जिल्ह्यात हवा कुणाची?: भोकर वगळता ९ पैकी ८ मतदारसंघांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला मिळणार पुन्हा हाबाडा?


नांदेडः एकेकाळी नांदेड जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या अशोक चव्हाणांसाठी ही विधानसभा निवडणूक कसोटी पाहणारी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या मागे नांदेड जिल्ह्यातील मतदार मात्र गेलेला नाही, हे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालातूनही सिद्ध होण्याची शक्यता आहे.इलेक्ट्रोरल एजने जाहीर केलेल्या निवडणूकपूर्व अंदाजात नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असे म्हटले आहे. अपवाद फक्त भोकर विधानसभा मतदारसंघाचा असेल, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सध्या सुरू असून प्रचार टिपेला पोहोचला आहे. आज सायंकाळी पाच वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील. या निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात कोणाची हवा? याबाबतचे अनेक सर्वेक्षण अहवाल येत आहेत. यापूर्वी लोकपोलने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इलेक्ट्रोरल एजने जिल्हानिहाय सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्या निष्कर्षांनुसार नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचेच विशेषतः काँग्रेसचेच वर्चस्व राहील असे एकंदर चित्र असून नांदेड जिल्ह्यातील मतदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा हाबाडा देतील, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.

इलेक्ट्रोरल एजच्या निष्कर्षांनुसार हदगाव- हिमायततनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर हे पुन्हा एकदा विजयी होतील तर महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागणार आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

 भाजप नेते अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण हे राज्यसभेवर गेले. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत भोकरमधून त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात श्रीजया चव्हाण विजयी होतील, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. नांदेड जिल्ह्यात महायुतीला मिळणारी ही एकमेव जागा ठरण्याची शक्यता आहे.

किनवट विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार प्रदीप नाईक यांच्यात काट्याची लढत होत असून या अटीतटीच्या लढतीत प्रदीप नाईक हे विजयी होतील आणि भाजपचे भीमराव केराम यांना पराभवाची धुळ चाखावी लागेल, असे इलेक्ट्रोरल एजच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.

नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला आणि ते लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु चिखलीकरांना विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार एकनाथ पवार विजयी होतील, असे इलेक्ट्रोरल एजच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.

कोणता मतदारसंघ कोणाकडे?

महाविकास आघाडीः किनवट(एनसीपी-शप), हदगाव-हिमायतनगर (काँग्रेस), नांदेड उत्तर (काँग्रेस), नांदेड दक्षिण (काँग्रेस), लोहा (शिवसेना (उबाठा)), नायगाव (काँग्रेस), देगलूर (काँग्रेस), मुखेड (काँग्रेस).

महायुतीः भोकर(भाजप)

कोणाला मिळणार किती जागा?

इलेक्ट्रोरल एजने जाहीर केलेल्या सर्वेक्षण निष्कर्षांनुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आले आहे. तर सत्ताधारी महायुती पराभवाच्या छायेत आहे.

महाविकास आघाडी- १५७

काँग्रेसः६८, एनसीपी (शप): ४४, शिवेसना (उबाठा): ४१, सप-१, माकप-१, शेकाप-२

महायुतीः ११७

भाजपः७९, शिवसेना (एकनाथ शिंदे): २३, एनसीपी (अप): १४, आरवायएसपी-१

इतरः१४

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *