छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकार यांना निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल, अशा ठिकाणी उपस्थित राहू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आदेश दिले.
खुलताबाद येथील कोहिनूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील झेबा इद्रिस खान यांनी केली होती तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकार यांनी राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजर राहून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी केली होती.
या दोन्ही तक्रारी संदर्भात आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुनावणी घेऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही प्रकरणात पुरावे तपासले आणि निर्णय दिला.
गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मझहर खान यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी होऊन प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची झेबा इद्रिस खान यांनी तक्रारीत म्हटले होते. डॉ. अंभोरे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकार हे २१ ऑक्टोबर रोजी महायुती सरकारमधील मंत्री आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या १२५ भिक्खूंना चिवरदान व भोजनदान कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार राहुल वडमारे यांनी केली होती.
या कार्यक्रमात येरेकार यांचा सक्रिय सहभाग नसल्याने निवडणूक कालावधीत अनावधानानेही राजकीय पक्षाचे उमेदवार वा धार्मिक व्यासपीठ जेथे आदर्श आचारसंहिता भंग होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उपस्थित राहू नये अशी ताकीद त्यांना आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे.
एखादा कर्मचारी राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास सहभागी झाला तर आचारसंहिता भंग होते.
मग एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा प्रधानमंत्री देशाचा गृहमंत्री देशाचे मंत्री राज्याचे मंत्री शासकीय पदावर असताना प्रचार कसे करू शकतात. मग हा आचारसंहितेचा भंग नाही का.