छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे या दोघा बहीण-भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून माझी कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली, असा गंभीर आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे.भाजप नेत्याच्याा मध्यस्थीनेच ही फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पत्रकार परिषद घेऊन मुंडे बहीण-भावावर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण महाजन यांच्या नावे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मध्ये ६३ एकर ५० आर जमीन होती. त्यापैकी ३६ एकर ५० आर जमीन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावाने जबरदस्तीने घेतली, असे सारंगी महाजन म्हणाल्या.
मला परळीतील अनुसया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेले. तेथे मााझ्याकडून सही घेण्यात आली. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडू देणार नाहीत, अशी धमकी मला दिली. गोविंद बालाजी मुंडे यानेच आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर त्याने आमच्याकडून एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी मी अंबाजोगाई येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मी न्यायालयात चकरा मारते आहे. मी पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण-भाऊ यांनी पूर्णपणे दहशत माजवली आहे.आणि त्यांच्या चमच्यांनी मला त्रास दिला आहे. मला किंवा माझ्या मुलांना काही झाल्यास त्यास पूर्णतः हे दोघेच जबाबदार असतील, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.
जिरेवाडी येथील ही जमीन पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व बीड-परळी मार्गालगत आहे. त्यातील २७ आर जमीन शासनाने रस्ते विकासकामासाठी संपादित केली आहे. उर्वरित ३६ एकर ५० आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने व दहशत माजवून गोविंद बालाजी मुंडे नोकराच्या माध्यमातून गोविंद मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गिते यांच्या नावे करून आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचेही सारंगी महाजन म्हणाल्या.
महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर ठरवून हा व्यवहार करण्यात आला. ठरवून व बोगस रजिस्ट्री करून हा व्यवहार करण्यात आला. या व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोपही सारंगी महाजन यांनी केला आहे.
गोपीनाथराव मुंडे हे मोठ्या मनाचे राजकारणी होतेे. परंतु त्यांच्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढत आहेत.गोपीनाथ मुंडेंचे राजकारण यांच्यापेक्षा कैकपटीने चांगले होते. मी राजकीय हेतूने काहीही आरोप केलेले नााहीत. मी राजकारणात नाही आणि राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.