मनसेला मोठा धक्काः अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज छानणीत बाद, कारणही आश्चर्यकारक!


अकोलाः लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रशंसा मनोज अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज छानणीतच बाद करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल मंगळवारी संपल्यानंतर आज उमेदवारी अर्जांच्या छानणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या छानणी प्रक्रियेत मनसेच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. अंबेरे या मनसेच्या अकोला जिल्हाप्रमुख आहेत.

विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी वयाची किमान २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचे वय २४ वर्षेच आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. कमी वय असल्यामुळेच प्रशंसा अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

प्रशंसा अंबेरे यांचे वय कमी असूनही मनसेने त्यांना उमेदवारी दिली आणि आपले वय कमी आहे, हे माहीत असूनही प्रशंसा अंबेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु भिंग लावून उमेदवारी अर्जांची छानणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकी त्रुटी पकडली आणि अर्ज बाद झाल्यामुळे प्रशंसा अंबेरे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीतून भाजप उमेदवार विजय अगरवाल रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून साजीद खान आणि शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार माघार घेतो की दोन्ही उमेदवार रिंगणात राहून महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होते, हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!