मुंबईः महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज एकाच तासात चार मोठे पक्षप्रवेश झाले. या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सांगलीमधीलच भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील, नांदेडचे माजी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. या नेत्यांनी प्रवेश करताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. भाजपचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना जयंत पाटलांविरुद्ध इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीमधून लोकसभेला पराभूत झालेले संजयकाका पाटील यांना तासगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार व आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पवार आणि संजयकाका हे एकमेकांविरुद्ध रिंगणात असतील.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चिखलीकरांचे नाव चर्चेत होते. परंतु चिखलीकरांनी अचानक पक्षांतर करून लोह्यातून अजित दादा गटाकडून उमेदवारी मिळवली.
मुंबईतील वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनीही आज अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरूण सरदेसाई आणि झिशान सिद्दिकी यांच्या आता लढत होईल.
राष्ट्रवादीची दुसरी यादी अशी
- इस्लामपूरः निशिकांत पाटील
- वांद्रे पूर्वः झिशान सिद्दिकी
- अणुशक्तीनगरः सना मलिक
- वडगाव शेरीः सुनिल टिंगरे
- शिरूरः ज्ञानेश्वर कटके
- तासगावः संजयकाका पाटील
- लोहा-कंधारः प्रताप पाटील चिखलीकर