मुंबईः सन २०१८-१९ ते २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही मुदत देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने यासंदर्भातील शासन निर्णय काढला आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. सन २०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंत महाडीबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत असली तरी पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरूनही अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहित वेळेत न लागल्यामुळे अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षी अर्जाचे नुतनीकरण करण्यात अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला आहे.
त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेअंतर्गतचे अर्ज निकाली काढण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही अंति मुदत देण्यात आली आहे.
या आहेत अटी-शर्ती
- ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर (Auto Reject) झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करुन ऑफलाइन अर्ज करता येईल.
- ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणालीवर महाडीबीटी अॅडमीन कडून अर्ज नामंजूर (Reject) झाले आहेत (उदा. Application is expired in the system since no action was taken) अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज सादर करता येईल. तथापि, कोणत्या कारणांमुळे ऑनलाइन अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा (याकरिता आवश्यकता असल्यास पोर्टलवरील दर्शवण्यात आलेल्या अर्ज स्थितीच्या स्क्रिनशॉटसह) व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाइन अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
- सदर ऑफलाइन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवरील नामंजूर झालेल्या अर्जाचा क्रमांक (Application ID) नमूद करणे आवश्यक आहे. सदर Application ID नमूद नसेल अशा अर्जाचा शिष्यवृत्ती मंजुरीकरिता विचार करण्यात येणार नाही.
- ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालयस्तरावरुन अथवा संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण स्तरावरुन नामंजूर (Reject) झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज सादर करता येणार नाहीत.
- जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणामुळे (विशिष्ट शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालयाकडील शुल्क निश्चिती वेळेवर न झाल्याने व विद्यार्थ्यांचे नियमित तसेच पुरवणी परीक्षाचे निकाल विहित वेळेत न लागल्यामुळे.) महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरू शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणमीमांसासह ऑफलाइन अर्ज सादर करता येतील. तथापि, सदर प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यासच शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे.
- सदर ऑफलाइन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील. त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदवणे आवश्यक राहील (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र, कॅप राऊंड प्रमाणपत्र इत्यादी.).
- ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती/फ्रिशिपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत, असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती/फ्रिशीपचे ऑफलाइन अर्जांकरिता लागू राहतील. महाडीबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षात मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रिशिपच्या ऑफलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- एकाच विद्यार्थ्याचे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच याप्रकरणी ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्याने द्यावे. सदर प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्याने अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पण्ण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- सन २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जांची मंजुरी करण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज सादर करुन त्यांना शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमार्फत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे शिष्यवृत्ती/फ्रिशिप करिता ऑफलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल.
- अंतिम मुदतीनंतर म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२४ नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाना शासनाकडून मंजुरी देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
- संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी अर्जांची तपासणी करुन आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शासनास सादर करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत असेल.
- ऑफलाइन मान्यतेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रकरणी ऑनलाइन शिष्यवृत्ती/फ्रिशिप देण्यात आलेली नाही याची खातरजमा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणयांनी करुन घेणे आवश्यक राहील. शिष्यवृत्ती/ फ्रिशिप दुबार अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची राहील.
- अश्या प्रकारे विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या सन २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्तीचे ऑफलाइन अर्जाची छाननी करून संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी सदरचे अर्ज विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेसह दि.१५.०२.२०२५ पर्यंत शासनाच्या वित्त विभागाने विहीत केलेल्या अन्वेषण प्रक्रियेचा अवलंब करुन शासन मान्यतेकरिता सादर करण्याची दक्षता घ्यावी.