भाजपकडून राष्ट्रवादीला केवळ ४२ जागांची ऑफर?, मित्रा-मित्रातील भेदभावामुळे अजित पवार गटात अस्वस्थता


मुंबईः आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४२ ते ४५ जागांची ऑफर दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र ८५ ते ८८ जागा देण्याची तयारी दाखवली असल्याचे वृत्त असून भाजपकडून मित्रा-मित्रात केल्या जात असल्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून आले, त्यापेक्षा आता सोबत किती आमदार आहेत, असा निकष भाजपने या जागावाटपाच्या ऑफरमध्ये लावल्याचे सांगितले जाते. परंतु हा निकष केवळ आमच्यासाठीच का? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला का नाही? असा सवाल अजित पवार गटाकडून विचारला जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावरून राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला ४२ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८८ जागा देऊन १५८ जागा स्वतःकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने विधानसभेच्या १६० जागा लढवण्याची तयारी केली आहे. परंतु महायुतीतील मित्रपक्षांकडून दबाव वाढल्यास आणखी तीन ते चार जागा ते सोडू शकतात. परंतु काहीही झाले तरी १५५ पेक्षा कमी जागा घ्यायच्याच नाहीत, यासाठी राज्यातील भाजप नेते आग्रही असल्याचे सांगितले जाते.

 भाजपने ठरवलेला महायुतीतील जागावाटपाचा हा फॉर्म्युला अजित पवार गटाला मात्र मान्य नाही. या फॉर्म्युल्याचा सर्वाधिक फटका अजित पवार गटालाच बसणार आहे. त्यामुळे अजित पवार गट अस्वस्थ झाला आहे. त्यामुळेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या जागावाटपाची घोषणा झालेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. या ५४ पैकी ३८ ते ३९ आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या सरसगट ५४ जागा अजित पवार गटाला देण्यास भाजप नेत्यांचा विरोध आहे. शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांचे मतदारसंघ अजित पवारांना द्यायचे कसे? शरद पवारांकडे असलेल्या मतदारसंघात अजित पवारांपेक्षा आमच्याकडेच सक्षम उमेदवार आहेत, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.

भाजपने देऊ केलेल्या ४०-४२ जागा जर आम्ही घेतल्या तर सध्या आमच्यासोबत असलेल्या विद्यमान आमदारांनाही तिकिटे देणे अवघड होऊन बसेल, अशी अडचण जागावाटपाच्या चर्चेत अजित पवार गटाकडून मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीने २०१९ मध्ये जिंकलेल्या ५४ जागा आणि आणखी सहा ते सात जागा जास्तीच्या मिळाव्यात, यासाठी अजित पवार गट आग्रही असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, सध्या सोबत विद्यमान आमदार किती? हाच जर जागावाटपाचा निकष असेल तर एकनाथ शिंदेंकडे अपक्षांसह ५० आमदार असताना त्यांना जास्तीच्या ३८ ते ४० जागा कश्या काय देऊ करता? दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का? असा सवाल अजित पवार गटाकडून विचारला जात आहे. अजित पवार गटातील खदखद लक्षात घेऊन भाजपकडून त्यांना अपेक्षित जागा सोडण्यात आल्या नाहीत तर अजित पवार गटाची पुढील रणनिती काय असेल? हे येत्या आठवडाभरात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!