विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग मंगळवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा


नवी दिल्ली: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान मुंबई  दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्यात २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची  विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.

कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा

 केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन दिवस मॅरेथॉन आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!