नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीस्थित निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनी ‘न्यायपालिका प्रणालीतील पारदर्शकता आणि आचार संहितेवर’ सवाल करत टिकास्त्र सोडले आहे तर भाजपने मात्र हा आपल्या संस्कृतीचा एक भाग असल्याचे सांगत पाठराखण केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बुधवारी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीस्थित निवासस्थानी पोहोचले. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास चंद्र्चूड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी पारंपरिक महाराष्ट्रीय टोपी आणि गणवेश परिधान केला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती आरती करून पूजा केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. मोदी हे गणपतीची आरती करताना न्या. चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दासही पूजास्थळी उपस्थित होते. स्वतः मोदी यांनीही एक्स या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर गणपती पूजेचा फोटो शेअर केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रीयन लुकमध्ये सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी केलेलेल्या या गणपती आरतीमुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ही सीजेआयच्या स्वातंत्र्याशी जाहीर समझोता
ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी या गणपती आरतीवरून सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘भारताच्या सरन्यायाधीशांनी न्यायपालिका आणि कार्यपालिकेतील सत्तेच्या विभाजनाशी समझौता केला आहे. सरन्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावरील सर्व विश्वासच गमावला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सरन्यायाधीशांच्या स्वातंत्र्याचा कार्यपालिकेशी केलेल्या या जाहीर समझौत्याचा निषेध केला पाहिजे,’ असे इंदिरा जयसिंग यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंगवर म्हटले आहे.
…हे तर न्यायाधीशांच्या आचारसंहितेचे उल्लंघन
‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या निवासस्थानी खासगी भेटीसाठी मोदींना अनुमती दिली, ही धक्कादायक बाब आहे. कार्यपालिकेपासून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आणि सरकार संविधानाच्या चौकटीतच काम करेल, हे पाहण्याची जबाबदारी असलेल्या न्यायपालिकेला यामुळे अत्यंत वाईट संकेत गेला आहे. त्यामुळेच कार्यपालिका आणि न्यायपालिकेमध्ये एक अंतर असले पाहिजे. हे न्यायाधीशांच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीशांनी एखाद्या खासगी धार्मिक सोहळ्याचे असे जाहीर प्रदर्शन करणे अनुचित आहे,’ असे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर म्हटले आहे.
उत्सव संपल्यानंतर सीजेआय थोडे मोकळे होतील…
ज्येष्ठ विधिज्ञांकडून टिकेची झोड उठवली जात असतानाच राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्स हँडलवर म्हटले आहे की, ‘ठीक आहे. आशा आहे की, उत्सव संपल्यानंतर सरन्यायाधीश उचित समजतील आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात संविधानाच्या अनुच्छेद १० ची घोर अवहेलनेवर सुनावणी पूर्ण करण्यासाठी थोडे मोकळे होतील, अशी आशा आहे. अरे थांबा, तश्याही निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे सुनावणी दुसऱ्या दिवसासाठी स्थगीत केली जाऊ शकते,’ असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
संविधानाच्या घरालाच आग लागली…
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनीही सरन्यायाधीशांचे नाव न घेता मोदी-चंद्रचूड भेटीवर आक्षेप घेतला आहे. ‘संविधानाच्या घरालाच आग लागली, घरातील दिव्याने. ईव्हीएमला क्लीनचीट दिली, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या सुनावणीला तीन वर्षांपासून तारीख पे तारीख, पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणी स्वतःहोऊन हस्तक्षेप मात्र महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणी उल्लेखही नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर तारीख पे तारीख… हे का होत आहे? क्रोनालॉजी समजून घ्या… भारत माता की जय!’, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
…हा न्यायपालिका, सीजेआयवर हल्लाः भाजप
विधिज्ञ आणि इंडिया आघाडीकडून होत असलेल्या टिकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. मोदींची ही भेट गणपती उत्सव एकत्र साजरा करण्या पुरतीच मर्यादित होती आण हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे, असे भाजपने म्हटले आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी एक व्हिडीओ जारी करून खा. चतुर्वेदी आणि इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांवर टिकास्त्र सोडले आहे.
‘सर्वात धक्कादायक, घृणास्पद,निंदनीय टिप्पणी प्रियांका चतुर्वेदी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी केली आहे. त्यांनी भारताच्या सरन्यायाधीशांकडे इशारा करत त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यांचा गुन्हा हा आहे की, प्रधानमंत्री मोदी गणेश पूजेच्या निमित्त त्यांच्या निवासस्थानी गेले होते. जे की कुणीही करतो. गणेश चतुर्थीच्या वेळी आमची सगळे एकमेकांच्या घरी जातो. हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे.
‘हे धक्कादायक आहे, आक्षेपार्ह आहे. हा न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या सरन्यायाधीशांवर हल्ला आहे. केवळ का तर प्रधानमंत्री मोदींनी गणेश आरतीसाठी अन्य लोकांच्या घरी जातो तसे तेथेही भेट दिली म्हणून…’ असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.