रक्तातही शिरले विभाजनवादी राजकारण: हिंदू रुग्णाला मुस्लिमाचे रक्त चढवण्यास सरकारी रूग्णालयाचा नकार, एमपीतील धक्कादायक घटना


भोपाळः आता रक्तही हिंदू-मुस्लिमांचे बनले आहे! मृत्यूच्या दारात असलेल्या हिंदू रुग्णाला आता मुस्लिमाचे रक्त चढवले जाणार नाही की काय?, असा गंभीर प्रश्न मध्य प्रदेशातील एका घटनेवरून निर्माण झाला आहे. हिंदू-मुस्लिम विभाजनवादी राजकारणाशी संबंधित एक अत्यंत भयावह चेहराच या घटनेमुळे समोर आला आहे. कोणतेही ठोस कारण न देताच मध्य प्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाने एका हिंदू महिला रुग्णाला कथितरित्या मुस्लिमाचे रक्त चढवण्यास नकार दिला आहे. तक्रार केल्यानंतरही हे प्रकरण थंड्या बस्त्यात टाकून दाबून टाकण्यात आल्याचाही आरोप आहे.

प्रकरण मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा सरकारी रुग्णालयातील आहे. पन्ना जिल्ह्यातील अजयगढ येथील रहिवाशी पवन सोनकर हे आपल्या आजारी आईला घेऊन जिल्हा सरकारी रुग्णालयात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना रक्ताची गरज भासली. डॉक्टरांनी रक्ताची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. पवन सोनकर आपल्या एका मित्राला घेऊन रूग्णालयात पोहोचले. तेव्हा त्यांना हिंदू रुग्णाला मुस्लिमाचे रक्त चढवले जाऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक हादरूनच गेले.

छतरपूरमधील काँग्रेसच्या जुन्या नेत्याचे घर बुलडोझर लावून पाडल्याच्या घटनेबद्दल राजकीय पक्षांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जाहीर करण्यासाठी शनिवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या प्रेसनोटमध्ये पन्ना जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेतील या घटनेचा एका ओळीत उल्लेख आहे.

‘पन्ना खेरीज दमोह जिल्ह्यातील हटा येथे मुस्लिमांच्या दुकानातून कोणत्याही वस्तू खरेदी करू नका, असे हिंदूंना आवाहन करण्यात येत आहे. छतरपूर येथील घटनेकडे या सर्व संदर्भाच्या पार्श्वभूमीवर बघण्याची गरज आहे,’ असे या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. ‘सत्य हिंदी’ या न्यूजपोर्टलने हे वृत्त दिले आहे.

या प्रेसनोटमध्ये उल्लेख केलेल्या पन्ना जिल्हा सरकारी रुग्णालयातील ब्लड बँकेत घडलेल्या घटनेची ‘सत्य हिंदी’ने पडताळणी केली असता धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ही घटना जुलै महिन्यातील असल्याचेही या पडताळणीत समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओतील संवाद असा-

४६ सेकंदाच्या या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती (पवन सोनकर, सोबत उभ्या रक्तदात्याकडे इशारा करत) ब्लड बँकेतील कर्मचाऱ्याला (त्याचे नाव शर्मा असल्याचे समोर आले आहे) विचारणा करत आहे…
व्यक्तीः कुणी सांगितले की यांचे रक्त चढवले जाऊ शकत नाही?
ब्लड बँक कर्मचारीः हां-हां, मी म्हटले. ती हिंदू आहे, हा मुसलमान.
व्यक्तीः त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे?
ब्लड बँक कर्मचारीः प्रॉब्लेम आहे ना… डोनर येथे येतात पण आम्हा लोकांच्या नोकरीचा प्रश्न असतो.
व्यक्तीः लिहून द्या की कोणत्याही मुसलमानाचे रक्त हिंदूला चढवले जाणार नाही.
ब्लड बँक कर्मचारीः (लिहून देण्यासाठी दबाव आणल्यानंतर म्हणतो) नाही, हिंदू-मुस्लिमाचा प्रश्न नाही, रक्तदात्याचा प्रश्न आहे.
व्यक्तीः जर रक्तदाता रक्त द्यायला तयार असेल तर मग…. (या वाक्यावर हा व्हायरल व्हिडीओ संपतो.)

या प्रकराची लेखी तक्रार करण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे स्थानिक पत्रकार अरविंदसिंह यादव यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत पन्ना जिल्हा सरकारी रूग्णालयाचे सीएमओ एस.के. त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी नुकताच बदली होऊन आलो आहे. त्या घटनेबद्दल अधीक्षक डॉ. आलोक गुप्ता सांगू शकतील. ब्लड बँक त्यांच्याच अखत्यारित येते,’ असे त्यांनी सांगितले. डॉ. गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *