मोहन भागवत यांना मोदी-शहा यांच्या दर्जाची सुरक्षा, आता ‘एएसएल’ कव्हरमध्ये वावरतील आरएसएस प्रमुख!


नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दर्जाचीच सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना सध्या असलेली झेड प्लस सुरक्षा वाढवून ऍडव्हॉन्स सिक्योरिटी लाईजन (एएसएल) करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या समीक्षा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांना नेमका कोणापासून धोका आहे? त्यांना प्रधानमंत्री आणि गृह मंत्र्याइतकीच सुरक्षा का देण्यात आली? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समीक्षा बैठकीत असे आढळून आले आहे की, बिगर भाजप शासित राज्यात दौऱ्यावर गेल्यानंतर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आली. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सीआयएसएफचे जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. आता ही सुरक्षा वाढवून एएसएल दर्जाची करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोहन भागवत हे बहुस्तरीय सुरक्षा कवचात असतील. एवढेच नाही तर त्यांना हेलिकॉप्टर प्रवासाची परवानगी केवळ विशिष्टरित्या डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमधूनच दिली जाईल.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवारचे नेते शरद पवार यांची सुरक्षा वाढवून झेड प्लस करण्यात आली होती. शरद पवारांची सुरक्षा वाढवल्याच्या काही दिवसांनंतर आता मोहन भागवतांची सुरक्षा वाढवून एएसएल दर्जाची करण्यात आली आहे. परंतु मोहन भागवतांना प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृह मंत्र्यांच्या दर्जा इतकीच सुरक्षा देण्यामागे ते इतके महत्वाचे आहेत का? त्यांना प्रधानमंत्री- गृह मंत्र्यांइतका धोका आहे का? भागवतांना नेमका कोणापासून धोका आहे? असे अनेक सवाल यानिमित्ताने सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

कशी असते झेड प्लस सुरक्षा?

भारतामध्ये एसपीजी हे सर्वात सुरक्षित सुरक्षा दल मानले जाते. एसजीपी केवळ प्रधानमंत्र्यांची सुरक्षा करते. त्यानंतर झेड प्लस सुरक्षा व्यवस्था सर्वात उन्नत असते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत ५५ सुरक्षा जवान ही सुरक्षा असलेल्या व्यक्तीला २४ तास सुरक्षा देतात. हे जवान नॅशनल सेक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजीचे कमांडो असतात. ज्या व्यक्तीला ही सुरक्षा देण्यात येते, त्याच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत आणि दौऱ्यातही हे कमांडो त्या व्यक्तीसोबतच असतात. प्रत्येक जवान मार्शल आर्ट आणि निशस्त्र लढण्यात प्रशिक्षित असतो. भारतात निवडक लोकांनाच ही सुरक्षा देण्यात येते.

कसे काम करते एएसएल?

एएसएल सुरक्षा व्यवस्था एका रुल बुकच्या आधारे काम करते. त्या रूल बुकला ब्ल्यू बुक (Blue Book) म्हटले जाते. या सुरक्षेत एक प्रकारचा प्रोटोकॉल असतो. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेत त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. एएसएल (Advance Security Liaison) मध्ये संबंधित राज्यांचे इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी, राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि संबंधित जिल्हा दंडाधिकारी सहभागी असतात. एएसएल रिपोर्टच्या आधारे सुरक्षेची तयारी केली जाते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!