शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यांना सुपारी देऊन केला प्रियकराचा खून


नाशिकः शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या वर्तणुकीचे धडे देणाऱ्याच शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी देऊन प्रियकराची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक पोलिसांनी पाच तासांत या प्रकरणाचा छडा लावून त्या शिक्षिकेला अटक केली आहे.

नाशिकच्या पंचवटीतील मेरी परिसरात निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे याचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने डोक्यात वार करून २५ वर्षीय प्रवीणची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गगन कोकाटे हा मसरूळ परिसरात रहात होता. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या भावना कदम या शिक्षिकेशी त्याची ओळख झाली. दोघांच्या या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. हे प्रेम प्रकरण रंगल्यानंतर गगन हा भावना या शिक्षकेला भेटण्यासाठी वारंवार त्रास द्यायचा. त्याचा राग मनात धरून भावना कदम हिने गगन कोकाटेचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी गगन कोकाटेच्या हत्येप्रकरणी संकेत रणदिवे (वय २०), मेहफुज सय्यद (वय १८), रितेश सपकाळे (वय २०) आणि गौतम दुसाने (वय १८) यांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही अशोकनगरचे रहिवाशी आहेत. तर गौतम दुसाने (वय १८) हा गंगापूर रोडचा रहिवाशी आहे.

पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता भावना कदम हिने गगन कोकाटेचा काटा काढण्यासाठी त्यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भावना कदम या शिक्षिकेलाही ताब्यात घेतले आहे.

भावना कदम ही विवाहित असून ती नाशिकमधील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातूनच तिची संकेत, महेफुज, रितेश आणि अन्य लोकांशी ओळख झाली. अटक करण्यात आलेली चारही मुले सामान्य कुटुंबातील आहेत. ते सातपूर औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत. पैशांच्या लोभापायी त्यांनी या गुन्ह्यात सहभाग घेतला.

आपल्याच विद्यार्थ्यांना सुपारी देऊन हत्येचा कट शिजवल्यानंतर भावना कदम हिने तिचा प्रियकर गगन कोकाटेला पंचवटीच्या मेरी कंपाऊड परिसरातील मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर भेटण्यासाठी बोलावले. तेथे आरोपी आधीच दबा धरून बसले होते. भावनाला भेटण्यासाठी गगन आल्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.  या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *