समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे कौटुंबिक संबंध, सरकारकडून त्याला वाय दर्जाची सुरक्षाः अनिल देशमुखांचा आरोप


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा सुरू असतानाच आज देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन नव्याने काही खुलासे केले. मिरजच्या समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे कौटुंबिक संबंध आहेत. समित कदमांची पत्नी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधते. समित कदम साधा नगरसेवकही नाही. तरीही त्याला सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध असल्याच्या पुष्ठ्यर्थ अनिल देशमुखांनी आज काही फोटो दाखवले आणि आपल्या आरोपात तथ्य असल्याचा दावा केला. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मिरजच्या समित कदमला माझ्याकडे पाच ते सहा वेळा पाठवले. एकदा तो एक बंद पाकिट घेऊन आला होता. त्याने मला सांगितले की, याचे प्रतिज्ञापत्र करून द्या. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार अशा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर मी खोटे आरोप करा, असे त्याने मला सांगितले. माझ्याकडे ते पाकिट आणून देणारा माणूस समित कदम होता, असे अनिल देशमुख म्हणाले.

समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांचे अनेक फोटो दिसतील. त्याचे फडणवीसांशी घरगुती संबंध आहेत. समित कदमची पत्नी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधतानाचेही फोटो आहेत. समित कदम साधा नगरसेवकही नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली. आता हा इतका कोणता कामाचा माणूस आहे की ज्याला सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली?, असा सवाल अनिल देशमुखांनी केला.

मिरज-सांगलीत चौकशी केली तर समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहेत ते कुणीही सांगेल. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला गेला. उद्धव ठाकरेंना खोट्या आरोपांत फसवण्यासाठीचा दबाव मी समजू शकतो, कारण ते राजकीय विरोधक आहेत. पण त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंवरही खोटे आरोप करायला सांगितले. तीन वर्षांपूर्वी अजित पवार त्यांचे राजकीय विरोधक होते. त्यामुळे त्यांचेही मी समजू शकतो. पण त्यांचा मुलगा पार्थवरही आरोप करायला सांगितले. म्हणजे राजकीय विरोधकांच्या मुलांनाही खोट्या आरोपांत कसे अडकवता येईल, याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी केला, असे देशमुख म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि समित कदमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी प्रतिज्ञापत्र बनवले असते तर उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत आले असते. आदित्य ठाकरेंनाही खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकले असते. ‘एक तो बीजेपी में आओ, या फिर जेल में जाओ’ असे भाजपचे धोरण आहे, असे टिकास्त्रही अनिल देशमुखांनी सोडले.

मला जेलमध्ये टाकून भाजपमध्ये घेण्याचा फडवीसांनी अयशस्वी प्रयोग केला. दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला आणि नंतर तिसरा प्रयोग अजित पवारांवर केला. हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले. माझ्यावर केलेला प्रयोग यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरेंचे सरकार तीन वर्षांपूर्वीच पडले असते, असा खुलासाही अनिल देशमुखांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *