नागपूरः आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले, असा खोटा आरोप प्रतिज्ञापत्र देऊन करण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दबाव आणला. त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरही खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. मी खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्यावर सीबीआय-ईडीची कारवाई करण्यात आली. मला तुरुंगात टाकण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
श्याम मानव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्या संदर्भात अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचे कारस्थान झाल्याचा दावा श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांचे थेट नाव घेत गंभीर आरोप केले.
तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझे देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणे करून दिले. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यात चार मुद्दे होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब यांची नावे त्यात होती. या चारही नेत्यांविरुद्ध खोटे आरोप करा, आणि प्रतिज्ञापत्र द्या, अशी ऑफर मला देण्यात आली होती. पण मी खोटे आरोप करण्यास स्पष्ट नकार दिला, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी त्यांचा खास माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने फोनवरून माझे फडणवीसांशी बोलणे करून दिले. मला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील चार नेत्यांविरोधात खोटे आरोप करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी दबाव टाकण्यात आला. मी प्रतिज्ञापत्र करून दिले असते तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार अडचणीत आले असते आणि आमचे सरकार फार आधीच कोसळले असते, असा दावा देशमुखांनी केला.
काय सांगितले होते आरोप करायला?
देवेंद्र फडणवीस यांनी या चार नेत्यांविरोधात नेमके काय आरोप करायला सांगितले होते, याचीही माहिती अनिल देशमुखांनी दिली. ‘उद्धव ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकासाठी मला पैसे जमवण्यास सांगितले,’ असा आरोप उद्धव ठाकरेंवर करा, ‘आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिले,’ असा आदित्य ठाकरेंवर आरोप करा, गुटख्याच्या बाबतीत अजित पवारांवर खोटे आरोप करा, अनिल परबांवर खोटे आरोप करा, असे मला फडणवीसांकडून सांगण्यात आले होते. त्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला, असे देशमुख म्हणाले.
मी दबावाला बळी पडलो नाही. खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास मी स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच माझ्या मागे ईडी- सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आला. खोट्या प्रकरणात मला अटक करण्यात आली. तुरुंगात टाकण्यात आले, असे देशमुख म्हणाले.
मी पुराव्याशिवाय बोलत नाही
मला हे सगळे त्यांनी सांगितले होते, याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. फडणवीसांच्या माणसाने मला दिलेला लिफाफा माझ्याकडे आहे. फडणवीसांचा कोण माणूस माझ्याकडे आला होता, हे सगळे माझ्याकडे आहे. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. वेळ आल्यावर सगळे पुरावे समोर आणेन. फडणवीसांनी पाठवलेल्या व्यक्तीचे नावही सांगेन. माझ्या शासकीय निवासस्थानी तीन वर्षांपूर्वी ही भेट झाली होती, असे देशमुख म्हणाले.
दुसरी ऑफरही दिली
मी खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दिल्यानंतर मला दुसरी ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी आमचा पक्ष एकसंध होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे मला नवीन ऑफर देण्यात आली. अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करताना अडचण येत असेल तर ठिक आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परबांवर खोटे आरोप करा, प्रतिज्ञापत्र द्या, अशी दुसरी ऑफर मला देण्यात आलेली होती, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे.