मुंबईः येत्या तीन तासांत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्या नुसार येत्या तीन तासांत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना व जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात या जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना मेसेज पाठवून सतर्क केले आहे.
ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या नऊ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता आहे.
उद्या १६ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.