विद्यापीठात ‘योगी बाबा’च्या वेगळ्याच ‘क्रीडा’; योगवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ‘मी काय तुमचा नवरा आहे का?’ म्हणत अश्लील भाषेत पाणउतारा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका ‘योगी बाबा’च्या वेगळ्याच क्रीडा सुरू आहेत. विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे प्रशिक्षण देणारा हा बाबा आपण दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा तर करतोच, शिवाय प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील भाषेत त्यांचा पाणउतारा करतो. भोंदूगिरी करणाऱ्या या ‘योगी बाबा’चे अनधिकृत योगवर्ग विद्यापीठात चालू देण्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत? विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या या ‘योगी बाबा’चे चाळे दिवसाढवळ्या सुरू असतानाही विद्यापीठ प्रशासनाला त्याची खबरही कशी लागली नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गेल्या एक ते दीडवर्षापासून या ‘योगी बाबा’चे योगवर्ग अनधिकृतपणे सुरू आहेत. हा योगीबाबा आपण योगाद्वारे मायग्रेन, लकवा यासारखे दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करतो. एका महिलेच्या मुलाला चालताही येत नव्हते परंतु आपल्या योगविद्येमुळे तो मुलगा चालायला लागला, असे उदाहरण देत हा भोंदूबाबा विज्ञानालाच आव्हान देतो. त्याच्या दाव्याला पुष्टी करणारी एक महिलाही त्याच्यासोबत असते.

वैद्यकीय उपचारापेक्षाही आपली योगविद्या प्रबळ असल्याचा दावा करणाऱ्या या ‘योगी बाबा’ची ‘किर्ती’ कानोकानी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहापर्यंत पोहोचली. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सात ते आठ विद्यार्थिनी या ‘योगी बाबा’च्या योगवर्गात प्रशिक्षणासाठी जायला लागल्या होत्या. प्रशिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थिनींना मात्र तेथे वेगळाच अनुभव आला.

‘तुमचे नखरे सहन करायला मी काय तुमचा नवरा आहे का?’, ‘हे तुमचे सगळे नखरे आहेत ना, तुमच्या नवऱ्यापाशी करा, मी काय तुमचा नवरा आहे का हे सगळे नखरे सहन करायला?’, ‘तुमची छपरी मुली आहात…’ ‘ तुम्ही हिजडे आहात का?’ अशी भलतीच योगविद्या या ‘योगी बाबा’च्या मुखातून बाहेर पडायला लागली. या ‘योगी बाबा’च्या या भलत्याच योगविद्येवर विद्यार्थिनींनी आक्षेप घेतला. भाषा आणि वर्तन नीट ठेवायला सांगितले. तरीही हा भोंदूबाबा ‘माझे कुणीही वाकडे करू शकत नाही,’ अशा भाषेत विद्यार्थिनींशी बोलायला लागला.

कार्यकर्त्यांनी काढला कानशिलातून ‘योगाचा जाळ’

विद्यापीठ परिसरात या ‘योगी बाबा’ने केलेले गैरवर्तन आणि वापरलेली अर्वाच्च भाषा विद्यार्थिनींना सहन झाली नाही. संतापलेल्या या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांना आपबिती सांगितली. मग काही कार्यकर्ते घेऊन वडमारे जाब विचारण्यासाठी क्रीडा विभागात पोहोचले. त्यांनी या ‘योगीबाबा’ला जाब विचारला. तेव्हा निर्लज्जपणे हा बाबा आपण विद्यार्थिनींशी तसे बोलल्याचे छातीठोकपणे सांगू लागला आणि तसेच बोलणार असेही म्हणू लागला. त्यामुळे वडमारे यांनी त्या बाबाच्या कानशिलात लगावून त्याच्या कानशिलातून योगाचा जाळ काढला.

बाहेरच्या व्यक्ती विद्यापीठ परिसरात येतातच कशा?

एखाद्या प्रश्न घेऊन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्यापीठ प्रशासनाकडे गेले की, हे विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत, असे सांगत विद्यापीठ प्रशासन त्यांची रास्त मागणीही ऐकून घ्यायला तयार होत नाही. परंतु विद्यापीठ परिसरात अनधिकृतपणे योगवर्ग घेणाऱ्या या योगी बाबाच्या योगवर्गात बहुतांश लोक हे विद्यापीठ किंवा विद्यापीठ परिसराशी संबंधित नाहीत. ते विद्यार्थीही नाहीत आणि विद्यापीठाचे कर्मचारीही नाहीत. मग विद्यापीठाच्या यंत्रणेचा वापर करून भोंदूगिरी करण्याचा परवाना या बाबाला कुणी दिला? हा खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!