विधान परिषद निवडणुकीत नेमका कोणाचा गेम होणार?, क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक धास्ती कोणाला? वाचा राजकीय समीकरणे


मुंबईः आगामी तीन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (12 जुलै) रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत उपांत्य लढत होणार असून 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीती आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी हॉटेल डिप्लोमसी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आकडेमोड करत आपल्या उमेदवारासाठी समीकरणे जुळवली जात आहेत. या निवडणुकीत एक उमेदवार पराभूत होणार हे नक्की आहे. तो उमेदवार कोणाचा? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, 6 जुलै रोजी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. भाजपकडून आपले सर्व पाच उमेदवार निवडून आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा शिंदे गट, अजित पवार गटही समीकरणे जुळवण्याच्या प्रयत्नात आहे. विरोधी पक्षाकडून काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटानेही आपल्या उमेदवारासाठी कंबर कसली आहे.

भाजपचे पाच, एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. शेकापला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीने मतदान होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीती आहे.

लोकसभेवर झालेली निवड, राजीनामे आणि काही सदस्यांचे निधन झाल्यामुळे विधानसभेतील 14 आमदार कमी झालेले आहेत. त्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 274 वर आले आहे. त्यामुळे विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा कमी झाला आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची गरज आहे.

विधानसभेत भाजपचे 103 आमदार आहेत. भाजपचे पाच उमेदवार असल्यामुळे हे पाचही उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज आहे. या 12 मतांसाठी भाजपची मदार मित्रपक्ष व अपक्षांवर आहे. शिंदे गटाकडे 37 आमदार आहेत. त्यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विजयासाठी शिंदे गटाला आणखी 9 मतांची आवश्यकता आहे. अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनाही अतिरिक्त 6 मतांची गरज आहे.

शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाकडे केवळ 12 आमदार आहेत. त्यांना अतिरिक्त 14 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे फक्त 15 आमदार आहेत. त्यांचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी 8 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडे सर्वाधिक 37 आमदार आहेत. काँग्रेसचा फक्त एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मते आहेत. हे 14 अतिरिक्त मते कोणाच्या पारड्यात जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या अतिरिक्त 14 मतांपैकी 7 मते उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळाली तर त्यांचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.  विधानसभेत 17 अपक्ष आमदार आहेत. या आमदारांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने आपलेच उमेदवार विजयी होतील, असा दावा केला आहे. यापूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली होती. फेब्रुवारीत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर शिंदे गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची भीती असल्यामुळे आपापले आमदार हॉटेलमध्ये ठेवण्याची खबरदारी या पक्षांनी घेतली आहे.

क्रॉस व्होटिंगची भीती सत्ताधाऱ्यांनाच

दरम्यान, महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकतील याची आम्हाला खात्री आहे. क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक भीती सत्ताधाऱ्यांनाच आहे, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही आमच्या आमदारांसोबत आहोत आणि आमचे आमदारही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला क्रॉस व्होटिंगची भीती अजिबात नाही. क्रॉस व्होटिंगची सर्वात जास्त भीती सत्ताधाऱ्यांना आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला आहे. त्यमुळे महायुतीतील अनेक आमदारांना भविष्याची चिंता वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *