मुंबई: राज्यातील सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून या सूतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांना प्रतीयुनिट रुपये ३ प्रमाणे ३ वर्षांकरिता वीज अनुदान व खासगी सूतगिरण्यांना प्रतीयुनिट रुपये २ प्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
यंत्रमागधारकांच्या अडचणी संदर्भात सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलतांना वस्त्रोद्योग पाटील म्हणाले, राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यंत्रमागधारकांना २७ एचपीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट १ रुपये अतिरिक्त वीजदर सवलत व २७ एचपीपेक्षा जास्त परंतु २०१ पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट ०.७५ अतिरिक्त वीजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हे ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत आहेत. कोविड काळातील अडचणीमुळे मिल बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही मिल सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन ही मिल सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत आमदार बच्चू कडू, अनिल देशमुख, नाना पटोले, रवी राणा, यामिनी जाधव, विजय देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.