विधानसभा निवडणुकीआधीच महायुती तुटण्याच्या मार्गावर, एकटा पडलेला अजित पवार गट ‘वंचित’शी युतीच्या प्रयत्नात?


मुंबईः भाजपच्या नेतृत्वातील महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतील घटक पक्ष वेगवेगळी लढवू शकतात, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांचे म्हणणे आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचेही संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवामुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवारांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सक्रीय पक्ष सक्रीय झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी नवी दिल्लीला जाऊन अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील पराभवाच्या कारणांवर चर्चा केली.

या चर्चेत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘फ्री हँड’ देण्याचे संकेत दिले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत काहीही फायदा झालेला नाही. आता ते महायुतीसाठी ओझे बनले आहेत. विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा जास्त जागांची मागणी करतील. त्यामुळे समस्या आणखी वाढतील, असे फडणवीस यांनी अमित शाह यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमित शाह यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फ्री हँड मिळताच अचानक आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझर आणि पांचजन्यमध्ये ‘अजित पवार हे महायुतीसाठी ओझे आहेत. भाजपने त्यांच्यापासून सुटका करून घेतली पाहिजे,’ अशी स्पष्ट भूमिका मांडणारा लेख प्रसिद्ध झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतले आहे आणि अजित पवार गटाला महायुतीतून काढून टाकावे, अशी शिंदे यांच्या शिवसेनेचीही इच्छा आहे.

आरएसएसच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या लेखावर अजित पवार गटाने तीव्र प्रतिक्रिया दिल्या. परंतु त्यावर फडणवीस आणि शिंदे यांनाही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा अजित पवार यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला नाही.

या घटनाक्रमादरम्यानच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांचे वक्तव्य आले. त्यातून अजित पवार हे नव्या युतीच्या शोधात असल्याचे संकेत मिळतात. अजित पवार गट महायुतीत राहून विधानसभा निवडणूक लढवणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा अजित पवार गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या, तेव्हा आधी भाजपशी नाते तोडा, तर पुढची बोलणी होईल, असे वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आले.

परंतु महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असे प्रयत्न सुरू आहेत. परंतु महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणेही विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे आ. मिटकरी यांचे म्हणणे आहे. एक पार्टी कार्यकर्ता म्हणून मला वाटते की, जर प्रकाश आंबेडकर, जे एक मोठे नेते आहेत, ते अजितदादांसोबत आले तर महाराष्ट्रातील समीकरणे बदलू शकतात. परंतु ही माझी इच्छा आहे, असेही आ. मिटकरी म्हणाले.

आ. मिटकरी यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत अजित पवार गटाने आमच्यासोबत येण्याची कल्पनाही करू नये, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होईल की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांना पश्चाताप

अजित पवार यांनी जून-जुलै २०२३ मध्ये आपले राजकीय गुरु आणि काका शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री बनण्यासाठी महायुतीत सामील झाले. अजित पवारांना सोबत घेऊन महायुती लोकसभा निवडणुकीला सामोरी गेली. परंतु या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी फक्त १३ जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर अजित पवार गटात चलबिचल सुरू झाली आहे.

अजित पवार गटाचे अनेक आमदार त्यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी संपर्क करू लागले आहेत. काही आमदारांना पक्षात पुन्हा घेतलेही जाऊ शकते, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. परंतु या राजकीय खेळात अजित पवार आता एकटे पडत चालले आहेत.

 काका शरद पवार यांनी त्यांना पक्षात परत घेण्यास नकार दिला. कारण आता शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास राहिलेला नाही. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची उरलीसुरली प्रतिष्ठाही लयाला जाण्याचा धोका आहे. ज्या भाजपच्या इशाऱ्यावरून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली होती, तोच भाजप आता त्यांची साथ सोडत आहे. त्यामुळे अजित पवारांना चांगलाच पश्चाताप होऊ लागला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *