मुंबईः नवी दिल्लीत होऊ घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी २१ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यास स्वीकृती दिल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉय उषा तांबे यांनी एक पत्रकाद्वारे दिली.
सरहद संस्थेच्या पुढाकारातून ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची व्यक्तिशः भेट घेऊन साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले होते. प्रधानमंत्री मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाकडून शरद पवारांना देण्यात आली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे स्थळ, वेळ, स्वरुप आणि इतर रुपरेषा साहित्य महामंडळ, संयोजक सरहद संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल, असेही तांबे यांनी या पत्रकात म्हटले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच देण्यात आला. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता याचा आगळा मिलाफ यानिमित्ताने केवळ महाराष्ट्र अथवा देशालाच तर अवघ्या जगातील साहित्य रसिक देशाच्या राजधानीतून अनुभवणार आहे, असे डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.